चेन्नई – सरकारकडून कोरोनाकाळात प्रवास करताना अनेक मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे नियम पाळणं बंधनकारक आहे. शिवाय आपला कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणंही आवश्यक आहे. या नियमांची पूर्तता करून एक प्रवासी विमानात चढला खरा, परंतु तिथं त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला उतरवून थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
झालं असं, की तामिळनाडूहून कोलकाताला जाणार्या ३५ वर्षीय प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची सूचना मिळल्यानंतर सोमवारी त्याला विमानातून उतरवण्यात आलं, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. हा प्रवासी मुंबई मार्गे कोलकाताला जाणार होता. त्याच्याकडे कोरोनाचा निगेटिव्ह अहवालही होता. तरीही नंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं. विमान कंपनीला याबाबत सूचना मिळाली होती, असं अधिकार्यांनी सांगितलं. प्रवाशाला त्वरित विमानातून उतरवून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठवण्यात आलं.