नवी दिल्ली – विमा पॉलिसीधारक आता विमा सेवेतील आपल्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पध्दतीने दाखल करू शकतील. त्यांच्या तक्रारींवर ठराविक वेळेत निष्पक्षपणे कारवाई केली जाईल. तसेच पॉलिसीधारकांना त्यांच्या तक्रारीची स्थिती ऑनलाइन पद्धतीने जाणून घेता येईल.
वित्त मंत्रालयाने विमा पॉलिसीधारकांच्या सोयीसाठी विमा लोकपाल (दुरुस्ती) नियम 2021 हे विधेयक अधिसूचित केले आहे. सुधारित नियमांमुळे लोकपालची व्याप्ती विस्तृत होत आहे. यापूर्वी विमा कर्मचारी, एजंट्स आणि इतर संबंधीत यांच्याशी झालेल्या कोणत्याही वादाची केवळ तक्रार केली जाऊ शकत असे. आता विमा कामगार, एजंट आणि अन्य संबंधीत सेवेत असलेल्याबद्दल लोकपाल तक्रार कक्षातही तक्रारी करता येतील. याशिवाय, विमा एजंटानाही लोकपाल प्रणालीच्या कक्षेत आणले गेले आहे.
सुधारित नियमांनुसार आता पॉलिसीधारक ऑनलाईन (इलेक्ट्रॉनिक ) पद्धतीने लोकपालकडे तक्रारी करण्यास सक्षम असतील आणि पॉलिसीधारक त्यांच्या तक्रारींची स्थिती ऑनलाईन शोधू शकतील म्हणून एक तक्रार व्यवस्थापन प्रणाली तयार केली जाईल.
या व्यतिरिक्त लोकपाल सुनावणीसाठी व्हिडिओ-कॉन्फरन्स देखील वापरू शकतात. लोकपाल निवड प्रक्रियेचे स्वातंत्र्य आणि अखंडता सुनिश्चित करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. लोकपाल म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तींचे स्वातंत्र्य आणि निःपक्षपातीपणा सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा उपाय देखील तयार केले गेले आहेत.