मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर विनोद कांबळी याचा आज वाढदिवस आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खास मित्र आणि त्याचा मैदानावरील डावखुरा जोडीदार अशी विनोदची ओळख आहे. त्याच्या निवृत्तीनंतर तो अधिक चर्चेत राहिला ते विविध वादग्रस्त घडामोडींमुळे. त्यात त्याचे अफेयर्स, त्याची दोन लग्न आदी गोष्टींचा उल्लेख करता येईल.
मुंबईतील कांजुरमार्गच्या इंदिरा नगरमध्ये १८ जानेवारी १९७२ला विनोदचा जन्म झाला. तो अत्यंत गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला. मात्र त्याने मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर स्वतःला सिद्ध केले आणि भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. फार कमी कालावधीचे करियर असले तरीही कांबळी कायम चर्चेत राहिला. विनोद कांबळीने १९९८ मध्ये पुण्यातील हॉटेल ब्ल्यू डायमंडमध्ये रिसेप्शनीस्ट असलेल्या नोएला लुईस हिच्यासोबत पहिले लग्न केले. २०१० मध्ये त्याने फॅशन मॉडेल एंड्रिया हिविट हिच्यासोबत लग्न केले आणि हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. जून २०१० मध्ये त्यांना मुलगा झाला. दोन वर्षांपूर्वी एंड्रियाला मुंबईतील एका मॉलमध्ये कुणीतरी छेडले. त्यानंतर जुलै २०१८ मध्ये मुंबईतील एका कुटुंबाने कांबळी आणि त्याच्या पत्नीविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. एका ५८ वर्षीय व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत होता. मॉलमध्ये राजेंद्र कुमार नावाच्या एका व्यक्तीचा हात एंड्रियाला लागला. त्यावर नाराज होऊन कांबळीने ५८ वर्षीय राजेंद्र कुमारला मारहाण केली. मध्यस्थी करायचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्तीच्या मुलालाही कांबळीने शिविगाळ केली. एंड्रियाने तर सँडल काढून मारायची तयारी केली होती. या प्रकरणात बांगुर नगर पोलिसांनी कांबळी दाम्पत्यावर गुन्हे दाखल केले होते.
ही पहिली वेळ नाही
विनोद आणि एंड्रियाची वादात अडकण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी २०१५ मध्ये त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या एका महिलेनेही दोघांविरुद्ध तक्रार केली होती. पगार मागितला म्हणून कांबळी दाम्पत्याने तिला खूप मारहाण केली आणि एका खोलीत बंद करून ठेवले. तीन दिवसांनी तिला घरी जाऊ दिले.