नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर आजपासून वाहनांची ये-जा अधिकृतरित्या सुरू झाली आहे. दिल्ली ते मेरठ हे अंतर ६०.४ किलोमीटरचे असून या एक्स्प्रेस-वे वरून ते अवघ्या ४५ मिनीटांमध्ये पूर्ण होईल. अर्थात बुधवारपासूनच हा मार्ग वापरायला लोकांनी सुरुवात केली आहे. सध्या दर निश्चित नसल्यामुळे कालपासून विना टोल वाहनांची येजा सुरू आहे.
दिवसभरात ५० हजार वाहने या मार्गावरून जातील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. भविष्यात एक लाखापर्यंत ही संख्या जाईल, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. टोल वसुलीसाठी आटोमॅटिक नंबर प्लेट रिडर सिस्टीम (एएनपीआर)चा वापर होणार आहे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. एकूण ८ हजार ३४६ कोटी रुपयांमध्ये हा महामार्ग तयार झाल आहे, हे विशेष. तर त्याची लांबी ८२ किलोमीटर आहे.
दिल्लीतील निझामुद्दीन ते युपी गेट, युपी गेट ते डासना आणि डासना ते मेरठ या तीन मुख्य टप्प्यांची लांबी ६०.४ किलोमीटर आहे. त्यादृष्टीने दिल्लीपासून मेरठ पर्यंतचा प्रवास ४५ मिनीटांमध्ये पूर्ण होईल. डासना ते हापूड बायपासच्या तिसऱ्या टप्प्यालाही याच प्रकल्पाचा हिस्सा मानला जात आहे. याची लांबी २१ किलोमीटर आहे.
दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वे आजपासून खुला करण्यापूर्वीच वाहनांची वर्दळ सुरू झाली होती. त्यामुळे पहिल्या दिवश ५० हजार वाहनांची ये-जा होईल, हा अंदाजही खरा ठरला. मात्र या मार्गाचा वापर वाढू लागल्यावर एक आठवड्याच्या आतच १ लाख वाहनांपर्यंत संख्या वाढलेली असेल असा दावा करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एएनपीआर सिस्टीमच्या माध्यमातून टोल वसुली होणार आहे. आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी इमर्जंसी कॉलबॉक्स लावण्यात आले आहेत. वाहनांच्या वेग मर्यादेसाठीही कॅमेरे लावण्यात आले आहेत.