नाशिक जिल्ह्यात कोणतेही राजकारण असू वा समाजकारण, वैचारिक विचारांचे ज्येष्ठ नेतृत्व डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही ते म्हणजे वनाधिपती विनायक दादा पाटील !
खऱ्या अर्थाने माझी समाजकारणात येण्याची वेळ असेल दशरथ धर्माजी पाटील हे महापौर असतांनाची. या साली त्यांनी खासदारपदाची निवडणूक लढविली होती. त्यात पराभूत झाले होते तरी दशरथ आप्पा पाटील यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे म्हणून खेतवानी लॉन्स येथे भोजनासह कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळेस आम्ही कारसूळचे ग्रामस्थ गेलो होतो. त्यावेळी दादांच्या भाषणाचे दोन शब्द कानावर आले होते. दादांना कोणी तरी प्रश्न केला होता की पराभवानंतर हा माणूस दुसऱ्या दिवशी पहाटे नाशिककरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बाहेर निघतो. आपण तर पराभवानंतर ८-८ दिवस बाहेर येत नाही, हे कसे शक्य आहे. यावर दादांनी सांगितले दशरथआप्पा यांच्या शेजारी बंगाला बांधा म्हणजे या अत्यंत हुशार व्यक्तिमत्वाची ओळख होईल. त्यानंतर भेटण्याचा किंवा जवळ जाण्याचा सहवासाचा कधी योग आला नाही. परंतु, २०१८ साली डॉ. प्राची पवार यांनी त्यांच्या प्रयत्नातून कुंभारी येथे जलशुध्दीकरण प्रकल्प भेट दिला होता. या जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी मला कुंभारी गावचे सरपंच नितीन जाधव यांनी निमंत्रण दिले होते. मी कार्यक्रमासाठी गेलो. कार्याक्रमाच्या अध्यक्षपदी दादा होते. या कार्यक्रमावेळी खाली बसलो होतो. माझा कुंभारी ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. परंतु, दादा आणि डॉ. प्राची पवार यांनी मला व्यासपिठावर बसण्यास सांगितले. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत कार्यालयात गेले. मी बाहेर थांबलो. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हाक मारत सांगितले की,काजळे तुम्हाला मध्ये बोलावले आहे. डॉ.प्राचीताई यांनी सांगितले की, दादा हा देवेंद्र काजळे कारसूळचा..! यावर दादा म्हणाले, हा शिवसैनिक आहे. मी नेहमी पेपर वाचत असतो, असे म्हणून मला जवळ बोलावून पाठीवर थाप मारत सर्व विचारपूस करीत फार सुंदर काम आहे. मला कारसूळला यायचे आहे शाळा बघण्यास. आमचे फार वेळ बोलणे झाले. परत दादांचा माझा संपर्क झाला तो, आमचे बंधू व मविप्रचे शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दत्तू काजळे यांच्याकडून अरे देवा दादा तुझी आठवण काढत होते. यावर मी त्यांना बोललो आपण दोघे जाऊ किंवा वेळ घेऊन द्या. आठ दिवसांनी सायंकाळी फोन आला की उद्या सकाळी ८ वा. घरी जा. त्यांना ९ वा. बाहेर जायचे आहे. परंतु, माझ्याकडून उशीर झाला. मी ९ वाजता दादांच्या घरी गेलो आणि गेट उघडून मध्ये गेलो. मधून दोन खुर्च्या अन् उन्हात बसू चालेल ना शिवसैनिक. त्यावर मी हो म्हटलो आणि आम्ही बसलो. पहिल्यांदा काय चाललं तुझ्या कारसूळकरांचे. नंतर थोड्या गप्पा झाल्या. मी हळूच दादांजवळ विषय घेतला की दादा माझ्या गावाला आपल्या प्रयत्नातून सभामंडपासाठी व वाचनालयासाठी निधी मिळातर फार भारी होईल. यावर दादांनी सुंदर उत्तर दिले. देवेंद्र बाजरीच्या सुडीवरुन लोकांनी द्राक्षबागांचे शेत बनविले. गरिबीचे दिवस गेले कारसूळकरांचे. मी स्वत: कारसूळला येतो आणि प्रत्येकाला सांगतो की १००० – २००० जमा करा व वाचनालय व सभामंडप बांधा. यावर शांत झालो आणि दादा तुम्हाला कारसूळला येण्याचे निमत्रंण देईल, असे म्हणून आम्ही निघून आलो. माझ्या गावाला येणाची व मला त्यांना माझ्या गावी आणण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिली, याची मनाला अजून खदखद आहे. कारसूळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
– देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते, कारसूळ