नाशिक – डाॅ. झाकिर हुसेन रूग्णालयातील आरोपी सफाई कामगार निलंबित करा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस ने केली आहे. कोरोनाग्रस्त महिलेचा मंगळवारी सफाई कामगाराने विनयभंग केला. याची दखल घेऊन चौकशी करण्यासाठी नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिका-यांनी रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी सफाई कामगाराला निलंबित करा अशी मागणी केली.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे, पूर्व विभागीय अध्यक्ष आसिया पीरजादा यांनी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. नितिन रावते यांच्याशी यावेळी चर्चा केली. या चर्चेत झालेल्या घटनेची माहिती डॅा. रावते यांनी दिल्याचे भामरे यांनी सांगितले. ४ सप्टेंबर रोजी कोरोनाग्रस्त पीडित महिला झाकिर हुसेन रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. मंगळवारी प्रकृती ठिक झाल्याने तिला डिस्चार्ज देण्यात येणार होता, रुग्णालयातून बाहेर पडण्याआधी महिला बाथरूम साठी गेली. त्याच वेळेला दारूच्या नशेत असलेल्या सफाई कामगाराने पाठलाग करून तिचे बाथरूम उघडण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने दरवाजा न उघडल्याने आरोपीने बाहेरून लघुशंका करून तिचा विनयभंग केला. पीडित महिला यांच्या कुटुंबियांना घटना समजल्यानंतर कुटुंबाने पोलिस स्टेशनची वणवण नको म्हणून गुन्हा दाखल केला नाही. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनातर्फे गुन्हा दाखल केला.