मुंबई – राज्य विधानपरिषदेच्या दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघांसह धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण विजयी होणार याची मोठी उत्सुकता आहे. या निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. या निवडणुकीसाठी गेल्या १ डिसेंबर रोजी मतदान झाले होते.
विधान परिषद निवडणुकीत सरासरी अंदाजे ६९.०८ टक्के मतदान झाले. त्यात औरंगाबाद पदवीधर ६१.०८ टक्के, पुणे पदवीधर ५०.३० टक्के, नागपूर पदवीधर ५४.७६ टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ ८२.९१ टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ ७०.४४ टक्के आणि धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघात सर्वाधिक ९९.३१ टक्के मतदान झाले आहे. धुळ्यातील १० पैकी ८ मतदान केंद्रात १०० टक्के मतदान झाले आहे. मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. त्यामुळे दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची चिन्हे आहेत.