मुंबई – विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज संस्थेच्या सहा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत ४ जागेवर विजय मिळवला आहे. यात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर व पुणे मतदार संघात आघाडीने जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने व काँग्रेसने प्रत्येकी दोन, भाजप व अपक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली. शिवसेनेला मात्र भोपळाही फोडता आला नाही.
नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या गडात पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी हे विजयी झाले. तर पुणे येथे पदवीधर मतदार संघात २० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी विजय प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण विजयी झाले आहे. पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर हे विजयी झाले आहे. अमरावती शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदार किरण सरनाईक विजयी झाले आहे.
सहा जागेपैकी धुळे – नंदुरबार या स्थानिक स्वराज संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल हे विजयी झाले आहे. सहा जागेपैकी महाविकास आघाडीला ४ जागा मिळल्या आहे. तर एक जागा भाजपला व एक जागा अपक्षाकडे गेली आहे. या निवडणुकीत एकीचा फायदा झाला. महाविकास आघाडीला एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीची ही परीक्षा होती. त्यात ते यशस्वी ठरले.
भाजपला धक्का
पदवीधर व शिक्षक मतदार संघाता यापूर्वी भाजपचा वरचष्मा होता. पण, महाविकास आघाडीने नागपूर व पुणे मतदार संघाच्या निवडणुकीत यश मिळवल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत दोन्ही मतदार संघात भाजपचे वर्चस्व होते. धुळे – नंदुरबार मतदार संघात स्थानिक स्वराज निवडणुकीत भाजपला यश मिळाले असले तरी ते यश अमरिश पटेल यांचे आहे.
असे आहे निकाल
नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपच्या गडात महाविकास आघाडी
नागपूर – विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी हे विजयी झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्याने भाजपच्या गोटात शांतता आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला आहे. थोड्याच वेळात वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
….
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी
औरंगाबाद – मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळविला आहे. या विजयामुळे त्यांनी हॅटट्रिक केली आहे. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ते विधानपरिषदेत जाणार आहेत. पहिल्या फेरीपासूनच चव्हाण यांनी आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम ठेवल्याने त्यांचा विजय झाला. सतीश चव्हाण यांना एकूण १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला. बोराळकर यांना केवळ ५८ हजार ७४३ मते मिळाली.
—
पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी
पुणे – पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. रात्री उसीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. लाड यांनी पसंतीचा कोटा पहिल्या फेरीतच पूर्ण केल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. अखेर पहाटेच्या सुमारास त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विजयी प्रमाणपत्र घेतल्यानंतर लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.
—
पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रा. जयंत आसगावकर विजयी
पुणे – विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांनी विज मिळविला आहे. प्रा. आसगावकर यांनी पहिल्या फेरीपासूनच चांगली आघाडी घेतली होती. त्यामुळे तेच विजयी होतील असा अंदाज होता. विद्यमान आमदार आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांचा पराभव झाला आहे. सावंत यांना भाजपने पाठिंबा दिला होता.
—
धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघात भाजपचे अमरिश पटेल विजयी
धुळे – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अमरिश रसिकलाल पटेल (भारतीय जनता पार्टी) विजयी झाले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अभिजित मोतीलाल पाटील यांचा पराभव केला. श्री. पटेल यांना ३३२, तर श्री. पाटील यांना ९८ मते मिळाली. चार मते अवैध ठरली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते श्री. पटेल यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
अमरावती शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांचा विजय
अमरावती – अमरावती शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांचा विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला आहे. किरण सरनाईक यांना १२ हजार ४३३ तर श्रीकांत देशपांडे यांना ९ हजार १९१ मते पडली. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला एकमेव जागा आली होती. येथे शिवसेनेचा पराभव झाला.