मुंबई – राज्यपालांच्या मार्फत विधान परिषदेवर नेमण्यात येणा-या १२ सदस्यांच्या नियुक्ती बाबत अनेक नावे चर्चेत आहे. त्यात चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव पुढे आले आहे. शिवसेनेतर्फे त्यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फोनवर संपर्क केल्याची चर्चा आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या संघर्षात कंगना रनौतला उर्मिलाने चांगलेच फैलावर घेतले होते. त्यामुळे हे नाव पुढे आले आहे.
उर्मिलाने याअगोदर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजकारणात प्रवेश करुन कॅाग्रेसतर्फे उमेदवारी केली होती. पण, नंतर तीने पक्षाला रामराम केला. त्यानंतर ती फारशी चर्चेत नव्हती. पण, आता विधानपरिषदेच्या उमेदवारीवरुन ती पुन्हा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसतर्फे सुध्दा उर्मिलाला विधान परिषदेसाठी विचारण्यात आले. पण, तीने प्रतिसाद न दिल्यामुळे शिवसेनेने संपर्क केल्याचे बोलले जात आहे.
तूर्त विधान परिषदेच्या १२ जागेसाठी शिफारस मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली जाते, पण, य़ा बैठकीत नावे अंतिम करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे या १२ सदस्यांत कोण असेल याची उत्सुकता आहे. शिवसेनेतर्फे सचिन अहिर, सुनील शिंदे, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, वरुण देसाई यांची नावे चर्चेत आहे. तर राष्ट्रवादीतर्फे एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, शिवाजी गर्जे यांची नावे आहेत. तर काँग्रेसतर्फे सचिन सावंत, नसीम शेख, सत्यजित तांबे यांचे नावे चर्चेत आहे. उर्मिला मातोंडकरचे नाव या यादीत असल्याचे बोलले जाते.