शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कायद्यात राज्याची दुरुस्ती करण्याबाबत महाधिवक्ता यांचे मत विचारात घेणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई – शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कायद्यात राज्याची दुरुस्ती करण्याबाबत महाधिवक्ता यांचे मत विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना न्याय देण्याबाबत सदस्य नागोराव गाणार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या विधानपरिषदेत बोलत होत्या.
शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांना आवश्यक आहे. ही किमान अर्हता प्राप्त करण्यासाठी वाढीव संधी देण्याची बाब केंद्र शासनाच्या अखत्यारित आहे. त्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. केंद्र सरकारला यासाठी पत्र पाठवून विनंतीदेखील करण्यात आली आहे.राज्यात 16 वेळा ही परीक्षा घेण्यात आली. ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना ती आयुष्यभरासाठी लागू राहावी अशी शासनाची भूमिका आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी सभापतींकडे लवकरच बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री गिरीशचन्द्र व्यास, विक्रम काळे कपिल पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
0000
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सहयोगी प्राध्यापक पदोन्नती व वेतन निश्चितीबाबत कार्यवाही – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई दि.04:- राज्यातील सहयोगी प्राध्यापक पदोन्नती व वेतन निश्चिती पडताळणीबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या त्रुटी निवारण समितीकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून ते प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. यासंदर्भात सदस्य अरुण लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यात सुमारे 500 प्राचार्यांची पदे भरावयाची होती. त्यापैकी 260 प्राचार्यांची भरती करण्यात आलेली आहे. उर्वरित पदांबाबत वित्त विभागाने परवानगी दिल्यानंतर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अरुण लाड व शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.
00000
भंडारा जिल्ह्यात पुरेशी धान खरेदी केंद्र सुरू – राज्यमंत्री विश्वजीत कदम
मुंबई – भंडारा जिल्ह्यात 26 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात पुरेशी म्हणजे 145 धान खरेदी केंद्रे कार्यरत आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये 205 राईस मिल धारकांची नियुक्ती करून त्यांचे करारनामे झाले आहेत.ज्या ठिकाणी गोदाम भरले आहे,अशा ठिकाणी स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या गोदामांमध्ये धानाची साठवणूक करण्यात येत आहे, कुठेही धान उघड्यावर पडलेले नाही अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी विधानपरिषदेत दिली.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सदस्य डॉ.परिणय फुके यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
पवनी तालुक्यात पूर्वी 9 खरेदी केंद्र कार्यान्वित होती, परंतु आता या तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे 23 धान खरेदी केंद्रांना नव्याने मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी 17 खरेदी केंद्रे कार्यरत आहेत, अशीही माहिती राज्यमंत्री श्री. कदम यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला.