राज्यातील महापालिका व नगरपालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही
मुंबई – मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत राज्यातील कुठल्याही महानगरपालिका व नगरपालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.
नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत निधी अप्राप्त असल्याबाबत विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते विधान परिषदेत बोलत होते.
कोविड-19 च्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता तसेच राज्याच्या उत्पन्नावरही मर्यादा आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्राधान्यक्रमाने विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नागपूर महानगरपालिकेत कुठलीही विकासकामे थांबविण्यासाठी नगरविकास विभागाने आदेश दिलेला नाही. ज्या कामांचे कार्यादेश निघाले आहेत ती कामे थांबणार नाहीत आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती मंत्री श्री.शिंदे यांनी दिली.
कोकणातील ज्या नगरपालिकांची स्थिती बेताची आहे, त्यांना मूलभूत सोयी – सुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका उप प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सदस्य डॉ. परिणय फुके यांनी सहभाग घेतला.
0000
आष्टी व शिरूर नगरपंचायतीच्या विकास आराखड्यास तात्काळ मंजूरी देणार – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई – बीड जिल्ह्यातील आष्टी व शिरूर नगरपंचायतीच्या विकास आराखड्यास मंजुरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्यास तातडीने मंजुरी दिली जाईल तसेच पाटोदा नगरपंचायतीचा विकास आराखड्याचा फेर प्रस्ताव विहित मुदतीत सादर करण्याचे आदेश सहायक संचालक नगर रचना, बीड यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.
बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा व शिरूर कासार या नवीन स्थापित शहरांच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळण्याबाबत सदस्य सुरेश धस यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. पाटोदा नगरपंचायतीचा विकास आराखडा विहित मुदत संपल्यानंतर शासनाला सादर झालेला असल्यामुळे त्याबाबत संविधानिक कार्यवाही पूर्ण होऊ शकली नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
विकास आराखड्यातील आरक्षणाबाबत तक्रारी असल्यास चौकशी
नगरपालिकांच्या विकास आराखड्यातील आरक्षणाबाबत कुणाच्या तक्रारी आल्या तर त्याची गुणवत्तेनुसार चौकशी केली जाईल. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असेही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.