१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत निधीचा चौथा हप्ता दोन महिन्यात देणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई – ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्याकरीता 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत निधीचा चौथा हप्ता दोन महिन्यात देण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य डॉ.संदीप धुर्वे यांनी या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत बंधित व अबंधित अशा दोन स्वरुपात निधी प्राप्त झाला आहे. सन 2020-21 या पहिल्या आर्थिक वर्षात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित केलेल्या अनुदानातून घ्यावयाची कामे त्यांचे नियोजन समन्वय व नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
बंधित स्वरुपात प्राप्त एकूण निधीच्या प्रत्येकी 50 टक्के निधीचा वापर स्वच्छता आणि पिण्याचे पाणी या बाबींसाठी करायचा आहे. हा निधी लोकसंख्येप्रमाणे देण्यात येणार असून गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या छोट्या छोट्या कामांसाठी वापरता येणार आहे. हा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य राहुल कुल यांनी भाग घेतला.
00000
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर बचत गटांमार्फत अंगणवाडी केंद्रात गरम ताजा आहार सुरु करणार – महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
मुंबई – राज्यात कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे अंगणवाडीतील बालके व गर्भवतींना पोषण आहार पुरविण्याचे कंत्राट महाराष्ट्र को.ऑपरेटिव्ह स्टेट फाऊंडेशन संस्थेला दिले असून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्थानिक महिला मंडळ व बचत गटांमार्फत अंगणवाडी केंद्रात गरम ताजा आहार सुरु करण्यात येईल, असे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.
सदस्य धर्मरावबाबा आत्राम यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्रीमती ठाकुर म्हणाल्या, राज्यात गेल्या वर्षापासून कोरोनाची साथ असल्याने अंगणवाडीस्तरावर दिला जाणाऱ्या गरम ताज्या आहाराऐवजी घरपोच आहार पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्या सुरु करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने आपत्तकालीन व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव सादर केला असता पुढील आदेशापर्यंत अंगणवाडी केंद्र सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ताज्या गरम आहाराऐवजी घरपोच आहार सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतर अंगणवाडी केंद्र सुरु करण्यात येतील. त्यानंतर महिला मंडळ व बचत गटांमार्फत अंगणवाडी केंद्रात गरम ताजा आहार सुरु केला जाईल, असेही श्रीमती ठाकुर यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भारती लव्हेकर, सर्वश्री संग्राम थोपटे, डॉ.संजय कुटे यांनी भाग घेतला.
00000
राज्यात कुष्ठरुग्णांसाठी स्वतंत्र वसाहत योजनेबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई – राज्यातील कुष्ठरुग्णांसाठी स्वतंत्र वसाहत बांधण्याच्या योजनेबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य ॲड.आशिष शेलार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सदस्य श्रीमती प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना श्री.देशमुख बोलत होते.
एका उपप्रश्नाला उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी सांगितले की, कुष्ठरोग शोध अभियानामध्ये डिसेंबर 2020 अखेर राज्यात 5281 नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी 450 (8.52 टक्के) लहान मुले आढळली आहेत. या अभियानात आढळलेल्या सर्व कुष्ठरुग्णांना त्वरित बहुविध औषधोपचार मोफत सुरु करण्यात आला असून त्यांच्या सहवासितांना प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात आला आहे. राज्यात 8 फेब्रुवारीपासून सक्रिय कुष्ठरोग शोध अभियान नियमित सनियंत्रण कार्यक्रम सुरु करण्यात आल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी भाग घेतला.
00000
धुळे जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन लवकर करणार – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
मुंबई- धुळे जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन लवकर केले जाईल. त्यातील ड संवर्गातील पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरले जातील, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी विधानसभेत प्रश्नात्तराच्या तासात सांगितले.
यासंदर्भात फारुक शाह यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री.पाटील म्हणाले, धुळे जिल्हा रुग्णालय 100 खाटांचे असून तेथे 100 खाटांचे महिला रुग्णालय आहे. जिल्हा रुग्णालय 200 खाटांचे करण्याकरीता श्रेणी वर्धनाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून आयुक्तालयामार्फत जोड बृहत आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. या दोन्ही रुग्णालयासाठी 137 पदे मंजूर असून त्यातील 89 पदे भरण्यात आली असून 48 पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या आरोग्य विभागाच्या पदभरतीच्या परीक्षेनंतर ही रिक्त पदे भरली जातील असेही त्यांनी सांगितले.
00000
अलिबाग तालुक्यातील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट एक महिन्यात करणार – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
मुंबई – अलिबाग तालुक्यातील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट एक महिन्याच्या आत करण्यात येईल, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य प्रशांत ठाकूर यांनी अलिबाग तालुक्यातील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, या रुग्णालयाच्या आंतररुग्ण इमारतीच्या रॅम्पला लोखंडी खांबाचे टेकू लावले आहे. त्याची पुर्नबांधणी करण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक जिल्हा शल्य चिकित्सकांना प्राप्त झाले असून ते जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी सादर केले आहे.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान एका उपप्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचा आढावा घेऊन त्यांची तपासणी केली जाईल. त्यात ज्या त्रुटी आढळतील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रवींद्र वायकर, अतुल भातखळकर, वैभव नाईक, श्रीमती सिमा हिरे यांनी भाग घेतला.