महागांव ते फुलसांगवी रस्त्याचे काम महिन्याअखेर पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण
मुंबई – यवतमाळ जिल्ह्यातील महागांव ते फुलसांगवी रस्त्याचे काम या महिन्याअखेर पूर्ण करण्यात येणार असून रस्त्याचे काम गुणवत्तेनुसार होण्याकरिता संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिली.
सदस्य मदन येरावार यांनी महागांव ते फुलसांगवी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, हे काम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत करण्यात येत आहे. अमरावती येथील अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ यांनी रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तपासणी केली आहे. राज्याला केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत 6 हजार 216 कोटी रुपये प्राप्त झाले असून राज्यात 6 हजार 625 रुपयांची कामे झाली आहेत. केंद्र शासनाकडून 409 कोटी रुपये अप्राप्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
००००
बेस्ट उपक्रमांच्या विकासकांकडील थकबाकी वसुलीसाठी लवादामार्फत प्रयत्न सुरु – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई – बेस्ट उपक्रमांची विकासकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी करारातील अटी व शर्तीनुसार लवादामार्फत प्रकरण निकाली काढण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रकरणी कुणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना नगरविकास मंत्री श्री.शिंदे म्हणाले, बेस्ट उपक्रमाच्या डेपोच्या जागा विकसित करण्याकरिता सहा विकासक होते. त्यांच्याकडून 533 कोटी रुपये येणे अपेक्षित होते. परंतु त्यांच्याकडून 529 कोटी रुपये जमा करण्यात आले. या विकासकांकडे 160 कोटी रुपये थकबाकी असल्याचे बेस्ट प्रशासनाने कळविले आहे. व्याजदराच्या अनुषंगाने असणाऱ्या रकमांबाबत व मुख्यत: दंडाच्या रकमांबाबत विकासकांचे बेस्ट उपक्रमाशी मतभेद आहेत. तथापि, ही वसुली करण्याकरिता करारातील अटी व शर्तीनुसार लवादामार्फत प्रकरण निकाली काढण्याकरिता प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री आशिष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर, सुनील प्रभू यांनी सहभाग घेतला.
००००
आर्णी नगरपरिषद : मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आठ दिवसाच्या आत पूर्ण करणार – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई – आर्णी (जि.यवतमाळ) नगरपरिषदेमध्ये मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आठ दिवसाच्या आत पूर्ण करुन चौकशीत आढळणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करु, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य डॉ.संदीप धुर्वे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री.शिंदे म्हणाले, या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदार यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आर्णीचे तहसिलदार यांनी तांत्रिक सल्लागाराची मदत घेऊन चौकशी पूर्ण करण्याचे व अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे. या प्रकरणाची आठ दिवसात चौकशी केली जाईल, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, भास्कर जाधव, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाग घेतला.