मुंबई – इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाचा मान नाशिकच्या व्यक्तीला मिळाला आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात विधानसभेचे कामकाज चालणार आहे. आजपासून (७ सप्टेंबर) हे अधिवेशन सुरू होत आहे. झिरवाळ यांच्यारुपाने प्रथमच नाशिककडे विधानसभेची धुरा आली आहे.
सर्वात मोठे पद
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद नाशिक जिल्ह्याने आपल्या कर्तृत्वाने मिळवले आहे. दिंडोरी मतदारसंघात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आमदार असलेले नरहरी झिरवाळ यांच्या रूपाने मुख्यमंत्री पदापेक्षा मोठ्या आणि मानाचे पद असलेले विधानसभा अध्यक्षपद प्रथमच नाशिकला लाभले आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी ही बाब अभिमानाची आहे.
पावसाळी अधिवेशन आजपासून
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न दिवंगत प्रणव मुखर्जी तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्यासह दिवंगत सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे. त्यानंतर विधेयके मांडली जाणार आहेत. तर, दुसऱ्या दिवशी विधेयके तसेच पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल.
यंदाच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरे, लक्षवेधी चर्चा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदस्यांसह कामकाज सहभागी होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी विधिमंडळ प्रवेशद्वारजवळ कालपासून चाचण्यांच्या व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच अधिवेशनासाठी विधिमंडळात प्रवेश दिला जाणार आहे. सभागृहातील आसनव्यवस्थाही बदलण्यात आली आहे. एका सदस्यानंतर दोन जागा सोडल्या जातील. काही सदस्यांना प्रेक्षक गॅलरीत बसवले जाणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने ते कामकाजात सहभागी होणार नाहीत. कोरोनामुळे अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सरकारकडून दिला जाणारा चहापानाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.