नवी दिल्ली – यावर्षी एप्रिल-मे मध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याकरिता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी पक्षातील काही नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या. हे सर्व निरीक्षक सक्रीय झाले असून काँग्रेसला या निवडणुकांपासून मोठ्या अपेक्षा आहेत.
भाजप प्रमाणेच काँग्रेस पक्षाने देखील निवडणूकी तयारी सुरू केली असून समन्वयासाठी पर्यवेक्षक नेमले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हे सर्व नेते कॉंग्रेसच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग असतील. कॉंग्रेसचे संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनिया गांधी यांनी संबंधीत राज्यातील पर्यवेक्षक नेमले असून ते राज्यांच्या प्रभारीबरोबर राहून समन्वयाने काम करतील.
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भूपेश बघेल, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक आणि शकील अहमद खान, तर केरळ विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत, लुईझिनो फ्लेयरिओ आणि जी. वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून नेमले गेले आहे. त्याच बरोबर पश्चिम बंगालसाठी ज्येष्ठ नेते बी.के. हरि प्रसाद , पंजाब सरकारमधील मंत्री विजय इंदर सिंघला आणि झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना वरिष्ठ निरीक्षक केले गेले आहे. तसेच तामिळनाडू आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ निरीक्षकांची जबाबदारी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली, एमएम पल्लम राजू आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितीन राऊत यांना देण्यात आली आहे.