नवी दिल्ली – पाच राज्यात होणा-या विधानसभा निवडणुकांमुळे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय पक्षांचा रस संसदेपेक्षा निवडणुकीच्या आखाड्यात अधिक असल्यानं मुदतीपूर्वीच अधिवेशन समाप्त होण्याची चिन्हे आहेत.
२५ मार्चला अधिवेशन संपवण्याच्या बाजूनं अनेक पक्ष
दोन आठवड्यांच्या आत सरकार आवश्यक विधेयके आणि आर्थिक कामे पूर्ण करणार आहे. २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन संपवणार आहे, असे स्पष्ट संकेत आहेत. तृणमूल काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन स्थगित करण्याची मागणी केली आहे.
तृणमूल काँग्रेसकडून पत्र
पाच राज्यांसाठीचे मतदान २७ मार्चपासून सुरू होणार आहे. अनेक पक्ष, खासदार आणि नेत्यांनी अधिवेशन गुंडाळण्याची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील खासदार सुदीप बद्दोपाध्याय यांनी लोकसभा अध्यक्ष तसेच राज्यसभेमधील नेते डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभा सभापतींना पत्र लिहून अधिवेशन स्थगित करण्याची मागणी केली आहे. २००८ आणि २०११ मध्ये झालेल्या निवडणुकांदरम्यान अधिवेशन मध्येच गुंडाळण्यात आल्याची उदाहरणे तृणमूल काँग्रेसने पत्रात दिली आहेत.
द्रमुककडून समर्थन
लोकसभेच्या कार्य समितीच्या बैठकीनंतर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांना वेगवेगळे भेटून अधिवेशन संपवण्याची मागणी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा टप्पा ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. परंतु त्याचदरम्यान राज्यांमधील निवडणुकांचा प्रचार जोरदार चालणार आहे. या मागणीला द्रमुकनंसुद्धा पाठिंबा दिला आहे. मात्र मुदतीपूर्वी अधिवेश ,संपवण्याच्या मागणीला काँग्रेसनं विरोध केला आहे.