नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडूसह काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ संकल्पात झुकते माप देत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या राज्यांमध्ये इकनॉमिक कॉरिडोअर उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या चारही राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच केंद्र सरकारने या घोषणा केल्या आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर करताना ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यांच्यासाठी भरभरून घोषणा केल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी देखील अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या वर्षात बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये नवीन आर्थिक कॉरिडोर तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
निर्मला सीतारमण यांनी बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामसाठी राष्ट्रीय महामार्ग आणि आर्थिक कॉरिडॉरची घोषणा केली. तर तामिळनाडूत १.०३ लाख कोटींचा नॅशनल हायवे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यातच इकॉनॉमिक कॉरिडोअर बनविण्यात येणार आहे. केरळमध्ये ६५ हजार कोटी रुपयांचे नॅशनल हायवे निर्माण करण्यात येणार आहेत. यावेळी मुंबई-कन्याकुमारी इकनॉमिक कॉरिडोअरचीही घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता- सिलीगुडीसाठी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. आसाममध्ये येत्या तीन वर्षात हायवे आणि इकनॉमिक कॉरिडोअर निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी यावेळी केली.
रेल्वे आणि मेट्रोसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० तयार करण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. रेल्वेसाठी सुमारे १.१० लाख कोटींचे बजेट जाहीर करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेसह मेट्रो, सिटी बस सेवा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी १८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मेट्रो लाइट आणण्यावरही भर देण्यात आला आहे. कोच्ची, बेंगळुरू, चेन्नई, नागपूर आणि नाशिक मेट्रो प्रकल्प तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.