नाशिक – संविधान सन्मानार्थ होणाऱ्या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी “मूठभर धान्य व एक रुपया ही मोहीम आज नाशिकरोड, जेलरोड परिसरात सुरू करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशीभाई उन्हवणे, कामगार नेते आनंद गांगुर्डे, कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक, अयाज अकबर खान, साराभाई वाळुंजकर, मुख्य विश्वस्त गणेश भाई उन्हवणे, किशोर ढमाले, रवींद्र पगारे, राज निकाळे, दादाभाई शिंदे, राजू गायकवाड, डॉ. अनिल सोनवणे, कय्यूम शेख, किरण दोंदे, बिलाल शेख, शाहरुख खान, जावेद शेख, रफिक टकारी, भारत कर्डक, हर्षल मोरे, दीपक कुमार, तोफिक शेख, सुरेखा कर्डक, यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
जेलरोड परिसरात कोविड नियम पाळत सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी ४-४ चे गट केले. यावेळी भीमनगरच्या स्थानिक नागरिक – महिला व छोटे दुकानदार, फळ विक्रेते यांनी यावेळी १ रु. ते १०० रु. पर्यंतची मदत संमेलनासाठी दान पेटीत टाकून केली. तर स्थानिक महिलांनी तांदूळ – गहू झोळी मध्ये टाकत संमेलनाला सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोहिमेचे पत्रक वाटप केले. अ.भा मराठी साहित्य संमेलन हे भोजनावळी उठवणाऱ्यांचे संमेलन असते तर विद्रोही हे कष्टकऱ्यांच्या घामातून उभे राहणारे विचार – कला – साहित्याचे संमेलन असते हा फरक यावेळी चर्चेतून संयोजकांनी स्पष्ट केले.