नाशिक – येथील अमरधाममध्ये कोरोना काळात विद्युत शवदाहिनीची मोठ्या प्रमाणत मदत होत आहे. त्याचबरोबर विद्युत शवदाहिनीच्या पुढील टप्प्याचे काम पूर्ण होऊन त्यासही सुरूवात झाली आहे. नाशिक अमरधाममध्ये विद्युत शवदाहिनीच्या वापरामुळे 2018 ते 5 नोव्हेंबर या काळामध्ये 701.420 टन लाकडाची बचत झाली आहे.
नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत 2018 साली नाशिकच्या अमरधाममध्ये विद्युत शवदाहिनी बसविण्यात आली आहे. आता पुढील टप्प्याचे काम पूर्ण झाले असून 30 सप्टेंबर, 2020 पासून सदर विद्युत दाहिनी कार्यान्वित झाली आहे. अंत्यसंस्कारावेळी लाकडाचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर तसेच वृक्षतोड थांबविणे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करता विद्युत शवदाहिनी सुरू करण्यात आली. कोरोना काळामध्ये सदर विद्युत शवदाहिनीची मोठ्या प्रमाणात मदत झाली असून पुढील टप्प्याचे काम होऊन दुसरीही विद्युत शवदाहिनी 30 सप्टेंबर, 2020 रोजी सुरू करण्यात आली आहे. विद्युत शव दाहिनीमध्ये अंत्यसंस्कारासाठी 5 ते 10 युनिट खर्च होत असल्याने वीजेचा वापरही मर्यादीत होत आहे, असे नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने सांगितले आहे.
आकडेवारीवर एक नजर
2018 ते 3 नोव्हेंबर, 2020 या कालावधीमध्ये 2063 अंत्यसंस्कार विद्युत शवदाहिनीद्वारे करण्यात आले आहेत (2018 ते 22 मार्च, 2020 – 519 अंत्यसंस्कार, 23 मार्च ते 5 नोव्हेंबर, 2020 दरम्यान 1544 अंत्यसंस्कार), त्याचबरोबर वायू प्रदूषणही टाळणे शक्य झाले आहे.