सध्याची परिस्थिती पाहता बऱ्याच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मनात भविष्यातल्या औद्योगिक बदलांबद्दल आणि नोकरीच्या संधींबद्दल अनेक प्रश्न आहेत. विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भावी विद्यार्थ्यांना व सध्या शिक्षण पूर्ण करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्यांनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. या सविस्तर लेखामध्ये वीज निर्मिती, विद्युत वाहन निर्मिती, स्मार्ट शहर निर्मिती, इत्यादी मध्ये असलेल्या संधी सांगितलेल्या आहेत. हा लेख अभियांत्रिकी मधली विद्युत शाखा का निवडावी याचे महत्व अधोरेखित करतो.
- प्रा. डॉ. रवींद्र मुंजे
सहयोगी प्राध्यापक व प्रभारी विभाग प्रमुख, विद्युत विभाग, के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक
क्षेत्राची व्याप्ती आणि भविष्यातील संधी
प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंत मानवी समुदायाच्या उत्क्रांतीसाठी अभियांत्रिकी क्षेत्राने प्रत्येक टप्प्यावर अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील नवनवे आविष्कार आणि मानवाची झालेली उत्तरोत्तर प्रगती यामुळे मानवी सुसंवाद आणि संप्रेषण सुलभ झाले आहे. अभियंते विशिष्ट क्षेत्रातल्या ज्ञानाचा उपयोग करून वस्तूंना कार्यान्वित करतात आणि समस्येचे निराकरण करतात, मग ती समस्या कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असो, उदा. वाहतूक, आरोग्य, बांधकाम, करमणूक, रोबोटिक्स, अवकाश किंवा पर्यावरण. माणसाचे आयुष्य आरामदायक बनवणाऱ्या प्रत्येक गोष्टीत अभियांत्रिकी आहे. त्यापैकी एक म्हणजे विविध प्रकारची विद्युत उपकरणे विकसित करणे होय. अभियांत्रिकीची विविध क्षेत्रे जरी असली तरी वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे विद्युत अभियंत्यांची भूमिका अधिक महत्त्वाची बनते. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ते कायम अग्रभागी असतात. खरं तर, विद्युत अभियांत्रिकी ही आधुनिकतेच्या धमन्या मधून वाहणारे रक्त आहे. आणि केवळ त्यामुळेच आपण नवनवे तंत्रज्ञान सक्षमपणे वापरू शकतो. भविष्यात या क्षेत्रात प्रचंड वाव आणि संधी आहेत. भारत सरकारच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रस्तावित योजना आणि गुंतवणूकींवरून हे पूर्णपणे स्पष्ट दिसून येते.
वीज निर्मिती क्षेत्रातील संधी:
भारत सरकारने औद्योगिक क्षेत्राची वाढ सुनिश्चित करण्यासाठी ऊर्जा क्षेत्राला एक प्रमुख क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२० नुसार, ऊर्जा क्षेत्रासाठी सुमारे रु. २२,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. इ. स. २०३० पर्यंत वाढणारी लोकसंख्या, वाढते विद्युतीकरण आणि विजेच्या दरडोई वापरातील वाढ लक्षात घेता ही गुंतवणूक वर्षानुवर्षे वाढतच जाणार आहे. ग्लोबल वार्मिंग आणि कार्बन उत्सर्जनाच्या बाबी लक्षात घेता केवळ अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासाठी २०२२ पर्यंत रु. ८००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करण्यात आली आहे. हीच गुंतवणूक २०३० पर्यंत टप्याटप्याने रु. २५००० कोटी पर्यंत नेण्यात येईल, त्याद्वारे ५०० गिगा वॅटचे ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. रेल्वे रुळांलगत असलेल्या रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवर सौर पॅनेल बसविणे आणि कृषी क्षेत्रात विद्युत ग्रीडशी जोडल्या जाणारे नवीन १ लाख सौर पंप बसविणे या सगळ्यांसाठी सुद्धा आर्थिक तजवीज केलेली आहे. खरे पाहता, भारतातली एकूण विद्युत निर्मितीची क्षमता बघता, अस्तित्वात असलेली वीज निर्मिती ही केवळ एक चतुर्थाउंश आहे. केंद्र सरकार अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर करून वीज निर्मिती करण्यावर जरी भर देत असले तरी सध्या अस्तित्वात असलेल्या व जुन्या झालेल्या खनिज तेल व कोळश्यावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. म्हणून, त्या प्रकल्पांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामध्ये या उर्जा प्रकल्पांमधील विद्युतीय पायाभूत सुविधा सुधारण्यात येईल. त्याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येऊ शकतात त्या सर्व जलस्रोतांचे सर्वेक्षण चालू आहे. थोडक्यात, ह्या सर्व आर्थिक तरतुदी व प्रस्तावित कामे, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात, उदा. पॉवर-ग्रीड, भेल, एनटीपीसी, टाटा पॉवर, इत्यादीमध्ये विद्युत अभियंत्यांना नोकरीच्या नवीन संधी उघडणार आहेत.
विद्युत वाहन निर्मिती क्षेत्रातील संधी:
भारत सरकारच्या संकरित आणि विद्युत वाहनांची निर्मिती व त्वरित अवलंब योजने नुसार, २०३० पर्यंत भारतात विजेवर चालणाऱ्या ३० % खाजगी वाहनांची, ७० % व्यावसायिक वाहनांची, ४० % बसगाड्यांची आणि ८० % दोन व तीन चाकी वाहनांची विक्री होईल. या योजने अंतर्गत संकरित व विद्युत वाहनांची रचना, बॅटरी (विजेरी) व्यवस्थापन प्रणाली, खनिज तेलावर चालणाऱ्या वाहनांची पुनर्रचना, ऊर्जा-कार्यक्षम यंत्रांची रचना, चार्जिंग स्थानके आणि संबंधित विद्युत पायाभूत सुविधा उभारणी, वाहन-ते-विद्युत ग्रीड आणि विद्युत ग्रीड-ते-वाहन संप्रेषण या सर्व क्षेत्रांना गती मिळणार आहे. या सगळ्यातून विद्युत अभियंत्यांना संशोधन आणि विकास, निर्मिती व रचना या क्षेत्रांमध्ये केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा खाजगी क्षेत्रात अमाप संधी उपलब्ध होतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यातून वैयक्तिक स्टार्ट-अप उभारण्यासाठी सुद्धा चालना मिळणार आहे. या स्मार्ट शहरांमध्ये पसरत जाणारं विद्युत मेट्रो व मोनोरेलच जाळं आणि रेल्वेच विस्तारीकरण यामधून सुद्धा पुढच्या ५ ते १० वर्षात मेगा भरती होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही.
स्मार्ट शहर निर्मितीतील संधी:
१०० स्मार्ट शहरांची घोषणा केल्यानंतर केंद्र सरकार देशातील नवीन ४000 शहरांची निवड करणार आहे. उपलब्ध संसाधनांचा, उदा. पाणी, ऊर्जा, यांचा उत्तम वापर करणे हे स्मार्ट सिटीचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. ऊर्जेचा विचार करता, स्मार्ट शहरांमध्ये, स्मार्ट ऊर्जा मीटरचा वापर करून, मिनिटा-मिनिटाची माहिती जतन करता येईल व कार्यक्षम विजेचा वापर होईल. नेट मीटरिंगने वैयक्तिक ऊर्जा निर्मिती व त्याचे मुख्य विद्युत ग्रीड मध्ये सामायिकरण सोपे झाले आहे. यामुळे विजेचा वापर नियंत्रित करण्यास आणि विद्युत कंपन्यांवरील प्रचंड दबाव कमी करण्यास मदत होईल. स्मार्ट मीटरिंग, नेट-मीटरिंग, होम ऑटोमेशन, ग्रीन बिल्डिंग, वैयक्तिक उर्जा निर्मितीला प्रोत्साहन आणि त्याचे मुख्य ग्रीडशी संलग्नीकरण हे विद्युत अभियांत्रिकीमधील नवीन उद्योजकांना जन्म देणारे ठरणार आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी:
इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशल इंटीलिजन्स यासारख्य आमूलाग्र बदल घडवणाऱ्या उपशाखांमुळे २०२२ पर्यंत जवळपास ३५०० कोटी नवी उपकरणे कार्यान्वित होणार आहेत. कार्यक्षम उर्जा हस्तांतरण, देखरेख आणि नियंत्रण यासाठी या तंत्रज्ञानाचे ऊर्जा अभियांत्रिकीशी एकत्रीकरण विद्युत अभियंत्यांसाठी नोकरीची नवीन दालने उघडेल. यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये ही इंटरनेटच्या एका क्लिकवर उपलब्ध आहेत. विद्युत अभियांत्रिकीचा नियमित अभ्यास करतानाच जर काही ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केले तर ते सहज शक्य आहे. त्याचबरोबर जर आधुनिक प्रोग्रामिंग कौशल्य आत्मसात केले तर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि प्रोग्रामर ही नोकरीची स्थानेसुद्धा निश्चित करता येतील, ज्यायोगे इन्फोसिस, कॉंग्निझंट, टी. सि. एस. इत्यादी कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकेल.
उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि इतर संधी:
इ. स. २०५० पर्यंत, बहुतेक सर्व क्षेत्रांचे विद्युतीकरण पूर्ण होईल असा अंदाज आहे. हे करीत असतांनाच, विविध उपकरणांच्या कार्यक्षमतेसाठी चांगल्या उर्जा गुणवत्तेवर (गुड पॉवर क्वॅलिटीवर) भर दिला जाईल. परिणामी, विद्युत अभियंत्यांनी उर्जा गुणवत्ता सुधारण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे अधिक महत्वाचे ठरेल. याठिकाणी विद्युत अभियंत्याना उर्जा व्यवस्थापक आणि प्रमाणित ऊर्जा ऑडिटर्स म्हणून काम करण्यास संधी राहील. उद्योग विद्युतीकरण तेवत ठेवण्यासाठी, विद्युत अभियंत्यांना वर नमूद केलेल्या सर्व परिस्थितींमध्ये सहज संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे.
या आश्वासक संधींव्यतिरिक्त उच्च शिक्षणाच्या व प्रशासकीय सेवेत काम करण्याच्या संधी ह्या कायमच आकर्षणाच्या विषय राहिलेल्या आहेत. उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवेश परीक्षेतून एम. टेक., एम. एस., एम. बी. ए., पी. एच. डी. यासाठी भारतात आणि परदेशात प्रवेश घेता येतो. परदेशी शिक्षणासाठी भारत सरकारच्या खूप योजना आहेत. भारतीय प्रशासकीय, अभियांत्रिकी आणि सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी आयएएस, आयईएस, एमपीएससी, यूपीएससी इत्यादी स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा विचार करता नजीकच्या काळात प्रशासकीय व अभियांत्रिकी सेवांमधली भरती वाढण्याची दाट श्यक्यता आहे.
सगळ्यात शेवटी विद्युत अभियांत्रिकीची निवड का करावी याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तंत्रज्ञानाच्या वेगवान विस्तारामुळे आपण नवीन पदवीधर असला काय किंवा अनुभवी व्यावसायिक असला काय, विद्युत अभियंता म्हणून नोकरी मिळविणे किंवा संबंधित व्यवसाय करणे हे नेहमीच सोपे जाईल.
(डॉ. मुंजे ह्यांनी विद्युत अभियांत्रिकीमध्ये शांघायमधून पोस्ट डॉक्टरेट पूर्ण केली आहे.)
मोबाईल: +९१ ९९२३१८१७११, ई-मेल: rkmunje@kkwagh.edu.in