नाशिक – राज्यातील मागासवर्गीय युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्याने स्थापन होत असलेल्या ‘अमृत’ या संस्थेचे मुख्यालय नाशिक येथे होणार असल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
याबाबत प्रकाशित झालेल्या शासननिर्णयात ‘अमृत’ संस्थेचे मुख्यालय नाशिक येथे होणार असल्याचे नमूद केलेले आहे. राज्य शासनाने राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध संस्था सुरु केल्या आहेत. यामध्ये मराठा व कुणबी समाजासाठी ‘सारथी’ संस्था असून तिचे मुख्यालय पुणे येथे आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी ‘महाज्योती’ हि संस्था असून तिचे मुख्यालय नागपूर येथे आहे. उर्वरित प्रवर्गासाठी असलेल्या ‘अमृत’ या संस्थेचे नियोजित मुख्यालय हे पुणे येथे होते; मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वेळोवेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाठपुरावा करून संस्थेचे मुख्यालय नाशिक येथे आणण्यात यश मिळविले आहे.
राज्यातील उर्वरित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नक्कीच या संस्थेचा फायदा होणार असून हि नाशिकची अभिमानाची बाब असल्याचे देखील भुजबळ यांनी सांगितले.