पुणे – विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांचे इतर प्रश्नाबाबत तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी समाज कल्याण विभागाला दिले. कदम यांनी आज सकाळी समाज कल्याण आयुक्तालयास भेट दिली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
समाज कल्याण आयुक्तालय मार्फत संपूर्ण राज्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात याबाबतचा धावता आढावा कदम यांनी यावेळी घेतला. संपूर्ण कार्यालय परिसराची पाहणी करून संभावित नवीन आयुक्तालयाच्या इमारत प्रस्तावाबाबत यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अवगत करून दिले. सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर चर्चा करून नवीन इमारती बाबत निर्णय घेऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आयुक्तालयाच्या वतीने आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम यांचे स्वागत केले.
याप्रसंगी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाज कल्याण चे अतिरिक्त आयुक्त श्री दिलीप डोके, सह आयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त प्रशांत चव्हाण, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळुंकी, सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड, यांच्यासह समाजकल्याण अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्तालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला श्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विविध योजनांची माहिती राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम यांना दिली.