नाशिक- आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात आरोग्य शाखांची महाविद्यालये सुरु करावेत असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विद्यापीठ नुतनीकरण इमारत व सौरउर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी केले.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सन्मानीय अतिथी म्हणून विधानसभा उपाध्यक्ष नहरही झिरवाळ, नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री छगन भुजबळ, विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण व औषध संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. समवेत कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या आवारात मेडिकल, आयुर्वेद, होमिओपॅथी आदी विद्याशाखांचे महाविद्यालय लवकरच सुरु करावे,त्यासाठी माझा सकारात्मक प्रतिसाद असणार आहे. आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो त्यासाठी प्रयत्नशिल रहावे. आरोग्य विद्यापीठाचे कार्य उल्लेखनीय असून जागतिक स्तरावर विद्यापीठाचे नाव व्हावे असे कार्य करावे असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, कोविड-19 परिस्थितीत सर्व विद्याशाखांनी एकत्र येऊन भरीव काम केले याचा मला अभिमान आहे. एकत्रितरित्या काम केल्याचा मोठा लाभ होतो याचे हे एक उदाहरण आहे. प्रतिकुल परिस्थितीत डॉक्टर आणि शिक्षक हे काम करतात त्यांच्या कार्य बहुमोल आहे. संसर्गजन्य परिस्थितीत सावधपणे काम करणे गरजेचे आहे. आरोग्य विद्यापीठाने सौरउर्जा प्रकल्पाला प्रारंभ केला असून हा प्रकल्प पर्यावरणपुरक आहेत याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य विद्याशाखांचे महाविद्यालय सुरु करण्याची कार्यवाही जलदरित्या करावी – भुजबळ
नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, नवनवीन विद्यापीठ हे शिक्षणाचे माहेरघर असते यामध्ये शिक्षणाबरोबर संशोधन व्हावे जेणेकरुन विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक होईल. विद्यापीठ परिसरात विविध आरोग्य विद्याशाखांचे महाविद्यालय सुरु करण्याची कार्यवाही जलदरित्या करावी तसेच यासाठी जिल्हा प्रशासन व महानगरपालिकने आवश्यक जागाही उपलब्ध करुन द्यावी जेणेकरुन भविष्यातील दृष्टीकोनातून अधिक व्यापक विस्ताराला संधी राहील असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, कोविड-19 आजाराच्या परिस्थितीत आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व संबंधित विभागाने लक्ष देऊन त्रुटींचे निवारण करावे असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाने आरोग्य शिक्षणाबरोबर संशोधनाचे कार्य करावे -अमित देशमुख
विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठाने आरोग्य शिक्षणाबरोबर संशोधनाचे कार्य करावे. कोविड-19 आजाराच्या परिस्थितीत भेडसावणारे समस्या पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी विद्यापीठाने तांत्रिक मनुष्यबळाकरीता नवनवीन अभ्यासक्रम सुरु करीत आहे. विद्यापीठ परिसरात नवीन महाविद्यालय सुरु करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक मदत तसेच निधी देण्यात येईल असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, कोविड-19 परिस्थितीत आरोग्य शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतांना विद्यापीठाने कोविड सुरक्षा कवच योजना सुरु केली. प्रतिकुल परिस्थितीत निर्णय घेतांना यशाच्या दिशेने वाटचाल करत राहणे गरजेचे आहे. वैद्यकीय शाखेबरोबर आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा, सिध्द आदी विद्याशाखांनी एकत्र येऊन महत्वपूर्ण लढा दिला. समाजाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
अनेक दर्जेदार वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे
यावर्षीपासून सुरु करण्यात येत आहेत- डॉ. दिलीप म्हैसेकर
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या परिक्षांचे संचलन संबंधित केद्रिय परिषदांचे मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात येते. कोव्हीड-19 या महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सर्व केंद्रिय परिषदा व संबंधित प्राधीकरणांशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करुनच परीक्षा घेण्यात आल्या आहेत.ते पुढे म्हणाले की, कोविड- 19 परिस्थितीत परीक्षा घेऊन विक्रमी वेळेत निकालही जाहीर करण्यात आले आहेत. आरोग्य विज्ञानाच्या सर्वच शाखांमध्ये कोविड 19 वर दर्जेदार संशोधन व्हावे यासाठी विद्यापीठातपर्फे विशेष संशोधन अनुदान उपलब्ध करण्यात आले आहे. कोरोना निवारणासाठी अधिक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी अनेक दर्जेदार वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे यावर्षीपासून सुरु करण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी राज्यपाल तथा कुलपती महोदयव प्रति-कुलपती अमितजी देशमुख, पालकमंत्री छगन भुजबळ आदींनी यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून विद्यापीठ निधीतील कर्मचा-यांसाठी उपदान (ग्रॅज्युटी) योजना लागू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
सूचना व मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन परीक्षा घेण्यात आल्या – डॉ. मोहन खामगांवर
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवर यांनी विद्यापीठ अहवाल मांडतांना सांगितले की, कोविड-19 परिस्थितीत परीक्षा घेतांना सर्व केंद्रीय परिषदा, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन यांच्या सूचना व मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. नवनवीन अभ्यासक्रमासमवेत विद्यापीठाने ऑनलाईन परिषदा, रिसर्च मेथडॉलॉजी वर्कशॉप, वेबीनार यांचे आयोजन कोविड-19 च्या परिस्थितीमध्ये केले असल्याचे त्यांनी सांगितले.
असा झाला कार्यक्रम
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. नुतनीकरण करण्यात आलेल्या विद्यापीठ इमारत व सौरउर्जा प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या धन्वंतरी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कोविड-19 आजाराची परिस्थिती पहाता शासनाने आदेशित केलेल्या निर्देशाचे पालन करण्यात आले.