पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ पुणे या उपक्रमास पुण्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील ९२० प्राप्त तक्रारी व निवेदानांवर यावेळी चर्चा करण्यात आली व त्यातील ७५० अर्ज सकारात्मकपणे निकाली काढण्यात आली. प्राप्त तक्रारी, निवेदनांपैकी ८१.५२ टक्के प्रकरणे मार्गी लागल्याने सर्वांमध्येच आनंदाची भावना असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ पुणे या उपक्रमाचे आयोजन १८ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून विद्यापीठाच्या इनडोअर हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः प्रत्येक प्रकरण हाताळत निवेदनांचा निपटारा केला. यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालयाचे डॉ. अभय वाघ, राज्य सामाईक परीक्षा विभागाचे चिंतामण जोशी, कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा, ग्रंथालय संचालनालयाच्या संचालिका शालिनी इंगोले तसेच मंत्रालय स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.
उपक्रम झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना उदय सामंत म्हणाले, आजपर्यंत एकूण ४ हजार ४११ अर्जांपैकी ४ हजार ५३ अर्जावर सकारात्मक निर्णय झाला आहे. आजच्या पुणे येथील उपक्रमात आलेल्या ऑनलाईन अर्जांपैकी ५१९ हे पुणे जिल्ह्यातील, १०९ नाशिक, ६२ अहमदनगर तर ऑफलाईन अर्जापैकी १६० हे पुणे जिल्ह्यातील, ५५ नाशिक, १५ अहमदनगर जिल्ह्यातील होते. या एकूण ९२० प्राप्त अर्जांपैकी ७५० अर्ज सकारात्मकपणे निकाली काढण्यात आले. तसेच आज अनुकंपा तत्वावर पुणे ०१, नाशिक ०२ नियुक्तीचे आदेश देण्यात आले. वैद्यकीय परिपूर्तीचे पुणे १२, नाशिक ०८, अहमदनगर ०४ आदेश वितरित करण्यात आले तर भविष्यनिर्वाह निधीचे २२८ ना – परतावा आदेश वितरित करण्यात आले. मृत्यू – नि- सेवा उपदान (DCRG) च्या मंजुरीचे आदेश ५ सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तींना वितरीत करण्यात आले. त्याचबरोबर पुणे १५२, नाशिक २५१, अहमदनगर ११८ कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र वितरीत करण्यात आले आहे. आज भविष्य निर्वाह निधीचे पुणे ५, नाशिक २ व अहमदनगर २ कर्मचाऱ्यांना अंतिम आदेश वितरीत करण्यात आले.
विद्यापीठाचा अभ्यासक्रम दोहा कतार येथे सुरु करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी प्रदान करण्यात आली.
तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) उपकेंद्रासाठी बालेवाडी येथे १० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विश्वविद्यालयाचे उपकेंद्र पुणे, रत्नागिरी, नांदेड व औरंगाबाद येथे स्थापन करणार तसेच प्रबोधनकार अभ्यासकेंद्र सुरु करण्यासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठातील दोन संविधानिक पदांचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर लवकरच मंजुरी देणार, आकृतिबंधातील १११ पदांना शासनाने मान्यता दिलेली असून विद्यापीठामार्फत रोस्टर मंजुरी प्राप्त करून घेतल्यानंतर पदभरती सुरु करणार वेतन अनुदानापोटी १९८८-८९ ते २०१९-२० पर्यंत थकबाकी १४० कोटी रुपयांच्या मागणीसाठी कार्यवाही करून टप्प्या टप्याने निधी वितरित करण्यात येईल.
प्राध्यापक भरती लवकरच
राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर भरती थांबविण्यासाठी ४ मे रोजी पत्र काढले होते. मात्र लवकरच ही भरती सुरू होईल. ज्या विषयाला महाविद्यालयात एकही प्राध्यापक नाही त्या विषयाच्या प्राध्यापकापासून भरतीस सुरूवात केली जाईल असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.