नवी दिल्ली – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा आणि माजी उद्योग मंत्री मुरुगेश निरानी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मात्र, ‘तुम्ही (येडियुरप्पा) विद्यमान मुख्यमंत्री आहात. तुमच्याविरुद्ध अटकपूर्व वॉरंट कोण जारी करू शकेल?’ असेही न्यायालयाने बजावले आहे.
कर्नाटक हायकोर्टाच्या ५ जानेवारीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कारण या कोर्टने येडियुरप्पा यांच्याविरूद्ध फौजदारी तक्रार कायम ठेवण्यास परवानगी दिली होती. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. खंडपीठाने फिर्यादी ए. आलम पाशा व इतरांना नोटीस बजावली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी येडियुरप्पा आणि निरानी यांची याचिका खंडपीठानेही मान्य केली. येडियुरप्पा यांच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशावरील किंवा खालच्या कोर्टाच्या कार्यवाहीवर स्थगिती मागितली. तसेच. खंडपीठाने दोघांनाही नोटिस बजावण्यास सांगितले. तोपर्यंत अटक होणार नाही, हे सुद्धा स्पष्ट केले.