श्रीनगर ः जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनंतर युरोप आणि अफ्रिकेच्या प्रतिनिधींचे एक पथक दोन दिवसांच्या दौर्यावर बुधवारी काश्मीर खोर्यात पोहोचणार आहे. प्रतिनिधींचे पथक जम्मूमध्ये नायब राज्यपालांची भेट घेणार आहे. राजयकीय नेत्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधींचा या पथकामध्ये समावेश आहे.
५ ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७० अनुच्छेद रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून केल्या गेलेल्या विकासकामांची पाहणी तसंच त्याची माहिती पथक घेणार आहे, असं अधिकार्यांनी सांगितलं. तसंच नवनिर्वाचित सदस्य, काही नागरिक आणि प्रशासनाच्या सचिवांचीही पथकासोबत बैठक होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक अधिकार देऊन त्यांना कसं सशक्त बनवले जात आहे, याची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात येणार आहे. काश्मीर खोऱ्यातल्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दलही वरिष्ठ अधिकारी या पथकाला माहिती देणार आहे. यामध्ये पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांबाबत आणि सतत युद्धविरामाचं उल्लंघन करण्याबाबतही पथकाला माहिती देण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी हे पथक जम्मूचा दौरा करणार आहे. तिथं नवनिर्वाचित सदस्य, काही सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नायब राज्यपालांचीही भेट घेणार आहे.