मनाली देवरे, नाशिक
….
रविवारी झालेल्या क्वालिफायर–२ सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने सनरायझर्स हैद्राबाद संघाचा १७ धावांनी पराभव करून आयपीएल २०२० ची अंतीम फेरी गाठली आहे.
मुंबई आणि दिल्ली संघ हे साखळीत अनुक्रमे पहिल्या आणि दुस–या स्थानावर होते. या दोघांनाच अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला असून, आता अग्रस्थानी असलेल्या मुंबईला खाली खेचून विजेतेपद पटकावण्याचे दिव्य दिल्ली कॅपीटल्सला पुर्ण करता येईल का ॽ याचा फैसला मंगळवारी निश्चीत होईल.
१८९ धावांचे आव्हान घेवून निघालेल्या प्रवासात सनरायझर्सच्या डावाची सुरूवात वाईट झाली. पहिले षटक रविचंद्रन अश्विनला देण्याची चुक श्रेयसने केली होती. परंतु, कागिसो रबाडाने ही चुक दुस–या षटकात सुधारून घेतली. त्याच्या लेगस्टंप बाहेरील एक इनस्विंगवर डावखुरा डेव्हीड वॉर्नर क्लिन बोल्ड झाला आणि दिल्लीने अर्धीअधिक मॅच इथेच जिंकली. दुस–या बाजुला वध्दीमान साहा सारख्या सातत्यपुर्ण फलंदाजी करणा–या खेळाडुची गैरहजेरी सनरायझर्सला सारखी जाणवत होती कारण प्रियम गर्ग आणि मनीष पांडे यांच्यासारखे महत्वाचे खेळाडू त्यानंतर लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. केन विलीयम्सन या न्युझीलंड संघाच्या कर्णधाराने या डावात जीव ओतण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची ६७ धावांची खेळी ही त्याच्या एकटयाची लढाई ठरली. शेवटच्या ३ षटकात रशिद खान आणि ही अब्दुल समद फलंदाजी करीत असतांना दिल्लीवर डाव उलटतो की कायॽ असा एकमेव रोमांचक क्षण सामन्यात आला होता. परंतु, कागिसो रबाडा सारखा महत्वाचा गोलंदाज संघात असेल तर हे शक्य होत नाही. रबाडाने १९ व्या षटकात ३ बळी घेवून केवळ सनरायझर्सला लगाम घातला आणि पर्पल कॅपचा किताब पटकावण्याचे आपले मनसुबे देखील आणखी मजबुत केले. अशाप्रकारे दिल्लीच्या पुढे जावून दुबईतला अंतिम सामना गाठण्यासाठी हैद्राबाद संघाला १७ धावा कमी पडल्या.
शिखर गाठणारा धवन
शिखर धवनने या सामन्यात ७८ धावांची दमदार खेळी केली आणि या खेळीच्याच जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करतांना १८९ धावांचा भलामोठा डोंगर विजयासाठी सनरायझर्स समोर उभा केला. या आयपीएलमध्ये जेव्हा दिल्लीचे सगळे यंगस्टर्स चांगला खेळ करीत होते त्यावेळेला शिखर धवन नावाचा गब्बर अपयशी ठरला होता. त्याच्या धावा होत नव्हता. परंतु, संघाला या अनुभव संपन्न खेळाडूने अशा सामन्यात आधार देण्यास सुरूवात केली जेव्हा इतर खेळाडूंच्या धावा थांबल्या आणि त्यामुळे संघावर साखळीतच बाद होण्याची नामुष्की ओढवते की काय, अशी परिस्थीती निर्माण झाली. या गब्बरसिंगने या सामन्यातही दिल्लीचा किल्ला चांगलाच लढवला. शिखर धवन या खेळीनंतर या सिझनमध्ये सर्वाधिक धावा करणा–या खेळाडूंच्या यादीत दुस–या क्रमाकावर पोहोचला आहे. १६ सामन्यात त्याच्या ६०३ धावा झाल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत ६७० धावा करणारा के.एल.राहूल हा एकमेव खेळाडू त्याच्या पुढे आहे. शिखर धवनसल अष्टपैलू मार्कस स्टॉयनीस (३८ धावा), श्रेयस अयर (२१ धावा) आणि शेवटचा तडाखा देणारा शिमरॉन हेटमायर (४२ धावा) यांनी केलेल्या कामगिरीमुळे दिल्लीने १८९ धावांची मजबुत अशी खेळी उभारली. रशिद खान या एकटया गोलंदाजाचा अपवाद सोडला तर सनरायझर्सच्या कोणत्याही गोलंदाजाला दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवता आला नाही.
- ही लढत अशा दोन संघांमध्ये होती ज्यांची साखळी सामन्यातली कामगिरी अगदी एकमेकांच्या विरूध्द होती. स्पर्धा सुरू झाल्यावर दिल्ली कॅपीटल्सने १४ साखळी सामन्यापैकी पहिल्या ९ पैकी ७ सामने जिंकून धमाल उडवून दिली होती. हा संघ यावर्षी विजेतेपद देखील जिंकून जातो की काय? अशी ठाम शंका त्याचवेळेला घेतली गेली होती. नंतरच्या सामन्यात माञ दिल्लीची कामगिरी विपरीत झाली आणि मग टॉप–४ मध्ये येण्यासाठी या संघाला दिव्य करावे लागले. सनरायझर्सने माञ पहिल्या ९ पैकी अवघे ३ सामने जिंकून गुणांच्या टेबलमध्ये तळ गाठला होता. शेवटी माञ त्यानी सलग ४ सामने जिंकले आणि चांगला नेट रनरेट राखून टॉप–४ गाठले होते. या सर्व प्रवासात एक महत्वाची गोष्ट सनरायझर्सच्या बाबतीत घडली आणि ती म्हणजे, त्यांनी फार्मात असलेल्या दिल्ली कॅपीटल्सला दोन्ही सामन्यात पराभूत केले होते.