नाशिक – गेल्या काही दिवसांपासून विजेच्या सातत्याने होणाऱ्या लपंडावाने नाशिककर नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणने आपल्या कार्यशैलीत वेळीच सुधारणा केली नाही तर मोठ्या प्रमाणावर जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल. एक जागरूक नागरिक हेमंत वाड यांनी या संदर्भात कैफियत मांडली आहे.
लॉकडाऊनपासून गेले काही महिने कामगारांचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग, क्लासेस सुरू आहेत. त्यामुळे सर्वांनाच विजेवर अवलंबून रहावे लागते. अशातच सातत्याने काही मिनिटांपासून तासांपर्यंत वीजप्रवाह खंडित होतो व काम ठप्प होते. वारंवार येणाऱ्या अडथळ्यांनी कामकाजावर, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो.बऱ्याच घरांमध्ये वयोवृद्ध नागरिक तसेच रूग्णही असतात त्यांना विजेअभावी अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांकडून विजबिलाची रक्कम विद्युत वितरण विभाग तत्परतेने जमा करतो. त्यामुळे अखंडीतपणे वीज मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यावर संबंधित विभागाशी दूरध्वनीवर संपर्क साधल्यास बऱ्याचदा एंगेजटोन येत राहतो. यदाकदाचित फोन लागलाच तर तो स्वीकारला जात नाही. संभाषण झालेच तर थातुरमातुर उत्तर मिळते. एखाद्या ग्राहकाने काही कारणाने विजबिलाची रक्कम वेळेत भरली नाही तर तातडीने त्याची विजजोडणी तोडली जाते. ही तत्परता एरवी कुठे जाते ? असा सवाल नागरिक करीत आहेत.
पावसाळ्यात वीज प्रवाह खंडीत होण्यासाठी थोडयाशा पावसाचेही निमित्त पुरते. वारंवार तांत्रिक बिघाड कसे होतात ? असाही प्रश्न नागरिकांना पडतो. ग्राहकसंख्येच्या वाढीनुसार महावितरणने जास्त क्षमतेची केबल टाकावी. सध्या भारनियमन नाही पण केंव्हाही वीज गायब होते. भारनियमनासाठी ठराविक वेळ तरी ठरलेली असते. त्यानुसार सर्वजण आपल्या कामकाजाचे वेळापत्रक ठरवू शकतात.पण सध्या वीज केव्हा गायब होईल याला धरबंधच राहिलेला नाही. अचानक वीज जाण्याने केलेले काम संगणकावर सेव्ह केलेले नसेल तर वाया जाते. परतपरत करावे लागून मनस्ताप होतो. महावितरणने आपल्या सेवेत त्वरित सुधारणा न केल्यास मोठे जनआंदोलन उभे राहू शकते इशारा देण्यात आला आहे.