मुंबई – राज्यात पुढील ४ ते ५ दिवस बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याने राज्यभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याची दखल घेत राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन सूचित केले आहे. योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यात देण्यात आले आहेत.
येत्या २ दिवसात राज्यामध्ये मराठवाडाच्या व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत पत्रक जारी केलेले आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई, ठाणेसह कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.