नवी दिल्ली – कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून भारतातून फरार झालेला कथित मद्यसाम्राट विजय मल्ल्या याने ब्रिटनच्या गृहराज्यमंत्री प्रीती पटेल यांच्याकडे ब्रिटनमध्ये राहण्यासाठी आणखी एकदा विनंती केली आहे. लंडनच्या उच्च न्यायालयात सुरू असलेल्या दिवाळखोरी प्रकरणात मल्ल्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी न्यायालयात ही माहिती दिली.
भारत सरकारकडे मल्ल्याच्या प्रत्यार्पणाविरूद्ध दाखल याचिका ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ऑक्टोबरमध्ये फेटाळली होती. तसेच पटेल यांनी त्या भारत प्रत्यार्पणाच्या आदेशावर सही करेपर्यंत तो सध्या जामिनावर आहे. मल्ल्यावर मद्य कंपनी व किंगफिशर एअरलाइन्सच्या संबंधात फसवणूक आणि घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मल्ल्या यांनी ब्रिटनमध्ये आश्रय मागितला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. मल्ल्याचे बॅरिस्टर फिलिप मार्शल यांनी कोर्टात सांगितले की, प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू मल्ल्या यांनी गृहराज्यमंत्री प्रीती पटेल यांच्याकडे संपर्क साधला आहे.