नागपूर – पत्रकारितेत मतभिन्नता असू शकते पण विचारांशी कटीबद्ध राहून समाजहिताला प्राधान्य देत काम करणे महत्त्वाचे आहे. अशा विचारनिष्ठ माणसांना प्रसंगी किंमतही मोजावी लागते. मात्र समाजाच्या न्यायासाठी निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या सर्वांचा हा गौरव आहे, अशी भावना केंद्रीय रस्ते परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा २०१९ च्या स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. लोकमतच्या दिल्ली आवृत्तीचे निवासी संपादक विकास झाडे आणि ज्येष्ठ पत्रकार तथा तरूण भारतचे संपादक गजानन निमदेव यांना २०१९ चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिव्हील लाईन्सच्या प्रेस क्लबच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात राज्याचे उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राउत यांच्यासह विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट तथा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, संघाचे व प्रेस क्लबचे सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर आदी उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी व्हर्चुअल माध्यमाद्वारे सोहळ्यात हजेरी लावली. त्यांनी विकास झाडे व निमदेव यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची प्रसंशा केली.
निमदेव यांनी विचारांशी एकनिष्ठ राहून समाजाचे हित जोपासले तर विकास झाडे यांनी दिल्लीत राहून विदर्भाचा आवाज बुलंद ठेवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. असे निरपेक्षा भावनेने कार्य करणाऱ्या पत्रकारांसाठी ते प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री नितीन राउत यांनीही झाडे व निमदेव यांच्या योगदानाचे कौतुक केले. एखाद्या पत्रकाराची लेखणी कशाप्रकारे चालली, त्या कालावधीत त्यांच्या लेखणीने समाजाला काय दिले, हे महत्त्वाचे आहे. समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकारांना सलाम आहे. वर्तमानात सरकारविरुद्ध लेखन करणाऱ्यांना राष्टद्रोही ठरविले जाते. तरीही काही लोक न भीता कार्य करतात. कोरोनाच्या संकट काळात पत्रकार योद्धाप्रमाणे काम करीत आहेत. अशा विरोधाभासी परिस्थितीत विचारांशी बांधील राहून काम करणाºया पत्रकारांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
निधी केला दान
गजानन निमदेव यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या व जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी कोविड निधी म्हणून पुरस्काराची राशी पत्रकार संघाला दान केली. विकास झाडे यांनीही व्यसनाधीन लोकांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या सत्यनारायण नुवाल संस्थेला पुरस्कार राशी दान करण्याचे जाहीर केले. संचालन ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांनी तर नगरसेविका प्रगती पाटील यांनी आभार मानले.