मुंबई – मराठी भाषा विभागाचे विंदा करंदीकर जीवनगौरव, श्री. पू. भागवत, मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक हे चार पुरस्कार अनुक्रमे रंगनाथ पठारे, शब्दालय प्रकाशन, डॉ.सुधीर रसाळ व संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना देण्यात येत असल्याची घोषणा मराठी भाषा विभाग व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
मराठी भाषेचा प्रसार, प्रचार करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात शासनास विशेष आनंद होत असून मराठी भाषा दिनी हे पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात येतील, असेही श्री.देसाई यांनी सांगितले. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा उपस्थित होत्या.
पुरस्कार विजेते
यावर्षीचा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप रु.5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. श्री.पठारे यांनी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळाचे सदस्य, वाङ्मय पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्य पद भूषविलेले आहे.









