पेठ – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरु करणे शक्य नसल्याने सर्व विद्यार्थी घरूनच शिक्षण घेत आहेत. परंतु अशा परिस्थितीत देखील पेठ तालुक्यातील कुंभाळे येथील बोरीचीबारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बसून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावात राहणारे पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी सांयकाळी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहे.
ऑनलाईन शिक्षणाची पायाभरणी सुरु असतांना आदिवासी भागात राहणारे विद्यार्थी मात्र यापासून वंचित राहतात. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पदवीच्या अंतिमवर्षाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असूनही वेळेचे नियोजन करून ज्ञानदानाचे काम करत आहेत. सांयकाळच्या शाळेत विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्यात येते. यात विद्यार्थ्यांना प्राथमिक तंत्रज्ञान, तसेच नवनवीन शोध प्रकल्प यांची माहिती देण्यात येते. पदवीच्या विद्यार्थ्याकडे असलेली माहिती तसेच त्यांना अवगत असलेले प्रकल्पाची माहिती देण्यात येते. शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसाराच्या या कार्यात रोशन निकुळे, संतोष मानभाव, मयूर भोये, तुषार गावित, अजय पालवी या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी साधने घेण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांकडे सुविधा उपलब्ध नसल्याने साध्या पद्धतीने शिक्षण देण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. याद्वारे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण दिसले आहे.
—
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, मात्र आदिवासी भागात नेटवर्क चा अभाव तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी साधने उपलब्ध नसतात. तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी साधने घेण्यासाठी संबंधित पालकांची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मुलांना शिकवण्याचे ठरवले. आपण जे शिकलो आहोत ते सामान्य मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत.
– रोशन निकुळे, विद्यार्थी