पहिल्या टप्प्यात होणार १९ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण :जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक – जिल्हा रुग्णालय नाशिक येथे सफाई कर्मचारी कार्यरत असणाऱ्या मिलिंद पवार यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. तसेच जिल्हा बालरोग तज्ज्ञ डॉ. बाबुलाल अग्रवाल (वय ६८ वर्ष) यांना दुसरी लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या तेरा केंद्रावर प्रत्येकी शंभर आरोग्य कर्मचा-यांना लस देण्याचे दैनंदिन उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यातील दोन्ही डोस देण्याची प्रक्रिया दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल अशी माहिती देखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात १९ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
जागतिक पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आज देशात सर्वत्र कोविड लसीकरणाची मोहीमेला सुरुवात झाली आहे. कोविड लढ्यातील हा अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. आपल्या जिल्ह्यात १३ लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आले असून या केंद्रांच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात १९ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीकरणा केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांला लसीचे काही साईड इफेक्ट जाणवल्यास प्रत्येक केंद्रावर १०२ व १०८ या अम्बुलन्सची सेवा २४ तासांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुढील उपचारासाठी जिल्हास्तरावर अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णालयाची निवड करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.