नाशिक – राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध संगणकीय अभ्यासक्रमांचे मोफत प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. हे प्रवेश व्यवसायिक प्रशिक्षण संस्थेत सुरू होणार असल्याची माहिती शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र तथा वसतिगृहाचे अधिक्षक यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात एक वर्ष प्रशिक्षण कालावधी असलेल्या सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस.ऑफिस, मोटार अँड आर्मेचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल हा इलेक्ट्रिक कोर्स आणि एम.एस.सी.आय.टी. या संगणकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस.ऑफिस या कोर्ससाठी इयत्ता ८ पास, तर मोटार अँड आर्मेचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज या कोर्ससाठी इयत्ता ९ वी पास पात्र असणे अनिवार्य आहे. वय वर्षे १६ ते ४० वयोगटातील विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. या अंतर्गत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय केली जाणार असल्याचे आयुक्तालयातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्यवसायाभिमुख मोफल प्रशिक्षण नेटवर्कीग व इंटरनेटची सुविधा पुरवली जाणार आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अनुभवी व तज्ञ प्रशिक्षक आणि अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी भांडवल योजना राबवण्यात येणार आली आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज आणि माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, गोदड मळ्याजवळ, मिरज जि. सांगली या पत्यावर पोस्टाव्दारे किंवा समक्ष मोफत स्वरूपात देण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरून त्यासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांग असल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि आधार कार्ड जोडावे अशी माहिती देण्यात आली आहे. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देणार असल्याचेही अधीक्षक यांनी स्पष्ट केले आहे. या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज भरावे असे आवाहन अपंग प्रशिक्षण केंद्र वसतिगृहाचे अधिक्षक यांनी केले आहे.