मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन क्षेत्रातील अनेकांना मदतीचा हात देणाऱ्या अभिनेत्री मधुरा वेलणकर हिला राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी ‘कोविडयोद्धा’ म्हणून सन्मानित केले आहे. लॉकडाऊन काळात मनोरंजन क्षेत्र पूर्णपणे ठप्प झाले होते. त्या काळात नवोदित लेखक तसेच कवींना मधुरा वेलणकर यांनी ‘मधुरव’ या सोशल मीडियावरील कार्यक्रमातून संधी दिली. त्यांच्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातील सर्वोत्कृष्ट १०० कवी, लेखकांना त्यांनी या कार्यक्रमातून संधी दिली. या कार्यक्रमानंतरही जे साहित्य शिल्लक राहिलं त्याचे उत्तमरीत्या संपादन करून त्याला दिवाळी अंकाचे स्वरूपही दिले. ‘आतिषबाजी’ या नावाने हा दिवाळी अंक नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रकाशितही झाला. अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या या उपक्रमाची दखल घेत त्यांचा ‘कोविडयोद्धा’ म्हणून सन्मान केला. राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी प्रशस्तीपत्र देत त्यांचा गौरव केला. लॉकडाऊनच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही एक उपक्रम सुरु केला. त्याला उदंड प्रतिसादही मिळाला. आणि याच कार्याचा गौरव होतो आहे, यामुळे खूप छान वाटत असल्याची प्रतिक्रिया मधुरा वेलणकर यांनी यावेळी व्यक्त केली.