नवी दिल्ली – काही रूग्णांच्या पायाच्या बाजूला किंवा अगदी आतल्या नसांमध्ये (डीव्हीटी) रक्त गोठून त्याच्या गुठळ्या तयार होतात, यामुळे त्यांच्या आजारामध्ये गुंतागुंत निर्माण होवू शकते. आता हे टाळता येणे शक्य आहे, कारण संशोधकांनी रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सुलभ रक्त प्रवाह सुरू रहावा, यासाठी एक स्वदेशी साधन-उपकरण तयार केले आहे.
या उपकरणामुळे दीर्घकाळ अंथरूणाला खिळून असलेल्या रुग्णांना, तसेच ज्या रुग्णांची हालचाल अजिबात होवू शकत नाही अशा अर्धांगवायू झालेल्या रुग्णंना लाभ होवू शकणार आहे. डीव्हीटीमुळे रुग्णांच्या ज्या भागाला सुरळीत रक्त पुरवठा होत नाही, तिथे सूज येते, तो भाग काळानिळा होतो, तसेच त्याभागातल्या अशुद्ध रक्ताचा फुफ्फुसापर्यंत पोहोचवले गेले तर रुग्णाच्या आजारामध्ये अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होवून रुग्णाच्या जीवाला धोका उत्पन्न होवू शकतो.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या त्रिवेंद्रमची स्वायत्त संस्था श्री चित्रा तिरूनल वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या (एससीटीएमएसटी) एका संशोधक पथकाने ‘डीव्हीटी’पासून संरक्षण करू शकणारे एक उपकरण विकसित केले आहे. या पथकामध्ये अभियांत्रिकी तज्ञही सहभागी झाले आहेत. जिथीन कृष्णन, बिजू बेंजामिन आणि कोरूथू पी वारूघेसे या तंत्रज्ञांच्या मदतीने हे उपकरण विकसित करण्यात आले आहे.
आपल्याकडे आत्तापर्यंत अशी साधने आयात केली जातात. त्यांची किंमत साधारणपणे २ ते ५ लाखांपर्यंत असते. ‘एससीटीएमएसटी’ने विकसित केलेल्या उपकरणाची किंमत एक लाखांपेक्षा कमी ठेवता येवू शकणार आहे.
नवीन उपकरण रुग्णाच्या पायातल्या नसांमध्ये बनलेल्या रक्ताच्या गुठळ्या विशिष्ट क्रमाने दाब देवून दूर करून रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत करणार आहे. उपकरणामध्ये रुग्णाला झालेल्या गुठळ्यां किती आणि कशा आहेत, हे लक्षात घेवून आवश्यक तेवढाच दाब देण्याची व्यवस्था आहे. तसेच दाब नियंत्रणाचे अगदी बारकाईने निरीक्षण-परीक्षण करणेही शक्य आहे. याचे व्हॉल्व्हचे नियंत्रण करण्यात येत असून त्यासाठी इलेक्ट्राॅनिक सर्किटचा वापर केला आहे. सुरक्षित दाब पातळी कायम टिकविण्यासाठी या उपकरणासाठी समर्पित सॉफ्टवेअर आणि नियंत्रण सर्किट प्रदान करण्यात आले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाला तरीही हे उपकरण काम करू शकणार आहे. कारण ते वीज पुरवठा ‘बॅक-अप’सुसज्ज आहे.
या उपकरणाच्या निर्मितीचा आणि विक्रीचा परवाना केरळमधल्या कोची येथे असलेल्या ‘एनप्रॉडक्टस’कडे हस्तांतरित करण्यात आला आहे. ही कंपनी सात वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून ऑटोमेशन आणि कंट्रोल विषयक उत्पादने तयार करीत आहे.