वाहनविक्रीची बनावट जाहिरात, तरूणास दोन लाखांचा ऑनलाईन गंडा
नाशिक : सोशल मिडीयावर वाहनविक्रीची जाहिरात टाकून भामट्यांनी तरूणास दोन लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन पैसे भरण्यास भाग पाडून हा गंडा घातला असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओमप्रकाश पुनमाराम बिश्नोई (रा.शाम अपा.हनुमाननगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बिश्नोई यास वाहन खरेदी करावयाचे असल्याने तो फेसबुकच्या माध्यमातून वाहनाचा शोध घेत असतांना ही घटना घडली. फेसबुक पेजवरील इनोव्हा कार पसंतीस पडल्याने त्याने १२ जानेवारी रोजी भामट्यांशी संपर्क साधला होता. यावेळी संशयीतांनी त्यास वेगवेगळी कारणे सांगून बनावट बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. २ लाख १ हजार २५० रूपयांचा भरणा केल्यानंतर बिश्नोई यांनी शोध घेतला असता वाहन विक्रीची जाहिरात बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक परोपकारी करीत आहेत.
…..
हातावर ब्लेडने वार करुन बोरगडला एकाची आत्महत्या
नाशिक : स्व:ताच्या हातावर ब्लेडने वार करून ५५ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना बोरगड भागात घडली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
अनिल बुधाजी अहिरे (५५ रा.अंकाई सोसा.एकतानगर) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. अहिरे यांनी रविवारी (दि.३१) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात स्व:ताच्या हातावर ब्लेडने वार करून घेतले होते. या घटनेत मोठा रक्तश्राव झाल्याने कुटूंबियांनी त्यास नजीकच्या न्यु सारा हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.
…
बेकायदा मद्यविक्री एकास अटक
नाशिक : किराणा दुकानामागे बेकायदा मद्यविक्री करणा-यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीताच्या ताब्यातून प्रिन्स संत्रा नामक देशी दारूच्या सुमारे दोन हजार रूपये किमतीच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. सुरज सुभाष चाफळकर (३६ रा. शिवाजी किराणा दुकानामागे,आंबेडकर नगर वरचे चुंचाळे,अंबड) असे संशयीत मद्यविक्रेत्याचे नाव आहे. शिवाजी किराणा दुकानामागे बेकायदा मद्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार युनिट २ च्या पथकाने गुरूवारी (दि.४) छापा टाकला असता संशयीत मद्यविक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे दोन हजार रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस नाईक नंदकुमार नांदुर्डीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.
…..
पेटवून घेत एकाची आत्महत्या
नाशिक : मद्याच्या नशेत पेटवून घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना महामार्गावरील स्वामी समर्थ नगर भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. महेश अरूण बाविस्कर (४० रा.घर नं. ५७ मनपा गार्डन, जत्रा हॉटेल मागे) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. बाविस्कर यास दारूचे व्यसन होते. गुरूवारी (दि.४) सकाळच्या सुमारास त्याने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात मद्याच्या नशेत पेटवून घेतले होते. या घटनेत तो गंभीर भाजल्याने कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार अभिमन्यू गायकवाड करीत आहेत.
…