संजय देवधर
…….
यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये मध्य प्रदेशातील आदिवासी कलाकार भुरीबाई, बिहारमधील मधुबनी कलाकार दुलारीदेवी यांचा समावेश आहे. मात्र ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या वारली चित्रशैलीतील एकाही महिलेच्या नावावर अद्याप पद्म पुरस्काराची नोंद नाही. वारली कलेत क्रांती करून ती जगभरात पोहोचविणाऱ्या जिव्या सोमा मशे यांना २०११ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पण ही कला ज्या महिलांनी जोपासली, त्यातील एकाही महिलेचे नाव पद्म पुरस्कारावर कोरलेले नसावे, ही नक्कीच चिंतेची व चिंतनाची बाब आहे. महाराष्ट्र शासन कलांच्या संदर्भात उदासीन आहेच. त्याबरोबरच वारली कलाकार, त्यांच्या संघटना फारशा आग्रही नाहीत, हे देखील या मागचे कारण आहे. लवकरच वारली कला प्रकाशात आली त्याला ५० वर्षे पूर्ण होतील. अशावेळी सिंहावलोकन करायलाच हवे.
जगातल्या लोककलांचा इतिहास अभ्यासला तर बहुतेक कला महिलांनीच जपल्या, जोपासल्या आहेत हेच लक्षात येते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैली महिलांनी दहाव्या शतकापासून जपली, फुलवली, वाढवली. मात्र त्यांची कुठे दखलच घेतली गेलेली नाही.वारली ‘ चित्र ‘वतीही व्हावी ‘ पद्म ‘वती असे ज्यांना वारली चित्रशैली विषयी आस्था, प्रेम आहे अशा सर्वांनाच नक्की वाटत असेल. एक कलावैभव शतकानुशतके जपणे ही फार मोठी गोष्ट आहे. बिहारच्या मधुबनी कलेलाही अशीच दीर्घ परंपरा आहे. त्यात तेथील महिलांचे मोठे योगदान आहे.तेथील राज्य शासनाचा त्यांना सक्रिय पाठिंबा मिळतो. आतापर्यंत मधुबनी कलाकार महिला जगदंबादेवी (१९७५),सीतादेवी (१९८१), गंगादेवी (१९८४), महासुंदरीदेवी (२०११), बऊआदेवी (२०१७)आणि गोदावरी दत्त (२०१८) या सहा जणींना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. एखाद्या कलाप्रकारासाठी जेव्हा असा राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळतो तेव्हा त्या कलाकाराचा तर सन्मान होतोच; पण त्याबरोबरच त्या विशिष्ट जनसमूहाचाही प्रातिनिधिक गौरव होतो, त्या कलाशैलीचीही प्रतिष्ठा वाढते. पुरोगामी महाराष्ट्र शासनाचे अद्यापही कलाधोरण निश्चित झालेले नाही. आदिवासी विकास विभाग देखील निरुत्साही आहे असेच म्हणावे लागेल. वास्तविक आदिवासी संस्कृती ही खऱ्या अर्थाने स्वयंभू आहे. तसेच संस्कार त्यांच्या कलेवरही झालेले दिसतात. रानावनात, दऱ्याखोऱ्यांतील दुर्गम पाड्यांवर राहणाऱ्या आदिवासी जमातींची समाजरचना निसर्गनियमांनी बांधलेली तरीही मुक्त असते. त्यांचे सामाजिक कायदेकानूनही निसर्गाला अनुसरून बनविलेले असतात. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बव्हंशी सर्व जग एक ‘ग्लोबल व्हिलेज’ झाले आहे. मात्र वन्य जमातींपर्यंत ही संकल्पना पोहोचायला बराच काळ जावा लागेल, पद्म पुरस्कारापासून वारली महिला वंचित राहिल्याचे वास्तव जणु हीच बाब अधोरेखित करते.
आदिवासी वारली स्त्रीजीवन नागरी स्त्रियांपेक्षा खूपच वेगळे आहे. अप्रूप वाटावे अशी समूहजीवनाची ओढ त्यांना असते. स्त्रीवर्गावर काही साहजिक निसर्गदत्त बंधनेही येत असली,तरीही तुलनेने त्या अधिक स्वतंत्र, मुक्त आहेत हे मात्र नमूद केलं पाहिजे.
रानावनाशी, निसर्गाशी दृढ नातं असणाऱ्या वनकन्यांंची मानसिकता फारशी बदललेली नाही.त्यांचा पोशाख,राहणीमान यात थोडेफार बदल झाले असले तरी मनस्वीपणे जगण्याचा अधिकार त्यांनी राखून ठेवला आहे. आत्मभान आल्याने त्या अधिक सजगही झालेल्या दिसतात. घरांमध्ये काही प्रमाणात महिलांचाच शब्द अखेरचा असतो. आदिवासी स्त्री-पुरुष सामाजिक, सांस्कृतिक जीवनात बरोबरीच्या नात्याने वावरताना आढळतात. त्यांचे सहजीवन तर प्रगत समाजापेक्षा काही पाऊले पुढेच दिसते.नवऱ्याला बायको सहजपणे अरे – तुरे करते. एकेरी नावाने हाक मारते. स्त्रीपुरुष समानता असल्याने एकत्रच मद्यपान, धूम्रपान यांचा आनंद घेतात.तारपा व इतर नृत्यांमध्ये स्त्रीपुरुष हातात हात घालून नाचतात, इतका मोकळेपणा त्यांच्यात आहे. पद्मश्री जिव्या मशे यांनी साधारणपणे ६० च्या दशकात वारली चित्रकलेत क्रांती घडवून आणली. महिलांनी जोपासलेली वारली चित्रशैली त्यांनी आत्मसात केली. त्यात कलात्मक भर घातली व जगभरात पोहोचवली. परिणामी आज पाड्यांवर पुरुषच वारली चित्रे रेखाटण्यात अग्रेसर आहेत. फार कमी प्रमाणात महिला चित्रे रंगविताना आढळतात. त्यात मशे परिवारातील जयश्री व अन्य काहीजणी तसेच तलासरीची रीना उंबरसाडा, प्रा. चित्रगंधा वनगा – सुतार या आणि इतर काही मोजक्या महिलांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
…या ठरल्या गौरवमूर्ती!
मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात पिटोल गावात राहणाऱ्या भुरीबाईला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. भिल्ल समाजातील या महिलेला यापूर्वी मध्य प्रदेश सरकारने शिखर सन्मानाने गौरविलेले आहे. त्याखेरीज अनेक पुरस्कार तिने मिळविले आहेत. भारत भवनचे माजी संचालक जे.स्वामिनाथन यांनी तिच्यातील कलागुणांना प्रोत्साहन दिले. त्यांनीच तिच्याकडून कागद व कॅनव्हासवर पेंटिंग्ज करवून घेतली. तेथून नवे तंत्र गवसल्यावर भुरीबाईने कधी मागे वळून बघितलेच नाही. सध्या ती भोपाळच्या आदिवासी लोककला अकादमीत चित्रकार म्हणून काम करते. तिच्या चित्रांमध्ये जंगल, पशुपक्षी, देवदेवता,जीवनशैली तसेच भिल्ल जमातीचे रीतिरिवाज, त्यांच्या पारंपरिक लोककथा हे विषय आढळतात. आता ती आधुनिक जगातील प्रतीकेही आत्मविश्वासाने रंगवते व समकालीन जीवनावर भाष्य करते.अलीकडे ती नैसर्गिक रंगांच्या ऐवजी पोस्टर कलर्स तसेच इतर रंग वापरून वेगळा परिणाम साधते. तसं बघता ती स्थानिक बोलीभाषेतच बोलू शकते,मात्र खरा संवाद तिच्या चित्रांमधूनच होतो.
अशिक्षित दुलारीदेवी पूर्वी साफसफाईची कामे करायची. आपले घर, अंगण, परिसर व इतरत्र झाडता झाडता तिच्या हातात झाडूऐवजी कुंचला आला. ती मधुबनी शैलीत चित्रे रंगवू लागली. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील रांटी गावात ती राहते. आतापर्यंत ८ हजारांहून अधिक चित्रे तिने रेखाटली आहेत. पद्मश्री महासुंदरीदेवी यांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले व ती अधिकच पारंगत झाली. आता दुलारीदेवी भिंत, कागद, कॅनव्हास यांसह अनेक माध्यमांच्या पृष्ठभागावर सहजपणे चित्रे रंगवते. मुख्यमंत्री नितीशकुमार, माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिचा कलेबद्द्ल गौरव केला आहे. पाटण्याच्या बिहार कलासंग्रहालयात दुलारीदेवी हिने रंगविलेले कमला नदीपूजन हे चित्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. सतरंगी नावाच्या ग्रंथात तसेच काही पाठ्यपुस्तकात तिची चित्रे प्रकाशित करण्यात आली आहेत.
मो – ९४२२२७२७५५