संजय देवधर, नाशिक
…..
काळाच्या ओघात अनेक कलाप्रकार निर्माण होतात. तेवढ्यापुरत्या त्या विशिष्ट कला लोकप्रिय ठरतात; पण विविध फॅशन्स जशा काही दिवसांतच बदलतात व मागे पडतात, तशाच या कलाही क्षणिक ठरतात व लुप्त होतात. काळाच्या कसोटीवर ज्या थोडयाशा कला उतरतात त्याच चिरंतन आनंद देतात. जनमानसावर शतकानुशतके अधिराज्य गाजवतात. अशा कलांचा परीघ साहजिकच विस्तारलेला असतो. अशा मोजक्या कला विश्वव्यापी ठरतात. याच श्रेणीतील समृद्ध लोककलेची ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेली वारली चित्रशैली एक शाश्वत कला म्हणून सुपरिचित आहे. या कलेचे वैशिष्ट्य म्हणजे ती निसर्ग व पर्यावरणाला हानी न पोहोचवणारी सृष्टिस्नेही जीवनशैली आचरणात आणण्याचा संदेश देते.
भारतात आदिवासींची लोकसंख्या सुमारे १० कोटींपेक्षा जास्त आहे. शंभराहून अधिक बोलीभाषांंमध्ये त्यांचा जीवनव्यवहार चालतो. आदिवासींच्या भाषा लिखित स्वरूपात उपलब्ध नसल्या तरी त्या भाषांंमध्ये साहित्य, संस्कृतीचे आगळेवेगळे विपुल भांडार आहे. आदिवासी जमाती इंडो-आर्यन व द्रविड भाषासमूहात मोडतात. आदिवासी भाषेच्या मौखिक परंपरेचे जतन लोकगीतांमधून झालेले असल्याचे आढळून येते. महिलांनी पिढ्यानपिढ्या लोकगीतांचा हा वारसा जपला आहे. डहाणूजवळ राहणारे हरेश्वर वनगा यांनी वारली जमातीच्या बोलीभाषेतील तब्बल ५५०० शब्दांचा संग्रह केला आहे. त्यांना समर्पक मराठी प्रतिशब्दही शोधून काढले आहेत. त्यातील अनेक शब्द संस्कृतोद्भव असून, काहींवर मराठी, गुजराती भाषेचे संस्कार आढळतात. वारली जमातीच्या अस्सल पारंपरिक व प्रचलित म्हणींचा मोठा साठा त्यांच्यापाशी आहे. ते उत्कृष्ट वारली चित्रे रेखाटतात. परंपरा व आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या चित्रांमध्ये आढळतो. वारली कला, संस्कृतीचा शाश्वत परीघ अधिक विस्तारण्यासाठी त्यांनी संकलित
केलेल्या शब्द, म्हणी व लोककथांचे सूत्रबद्ध असे दस्तावेजीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला पाहिजे.
वारल्यांची जीवनशैली, त्यांची समृद्ध लोकसंस्कृती, चालीरीती यांचा अभ्यास करून त्या जाणून घेतल्या पाहिजेत, तरच वारली चित्रकला सर्वार्थाने समजू शकेल. या चित्रांमागची पार्श्वभूमी, विचारधारा, संकल्पना लक्षात आल्या तर ती अधिकाधिक आस्वादानुकूल तशीच आकलन सुलभ होते. बरेचदा वरपांगी साध्या दिसणाऱ्या चित्रात अनेक व्यामिश्र अर्थ, संकेत लपलेले असतात, ते रसिकाला या माध्यमातून जाणून घेता येतील. आदिवासी वारली जमातीने आपली प्राचीन परंपरा व सांस्कृतिक संचित प्राणपणाने जपले आहे. शेतीशी संबंधित व्यवसाय, घरांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, वेषभूषा, आचारविचार, आहाराच्या पध्दती, चालीरीती, धर्मकल्पना, देवदेवता, उपासना पद्धती, रूढी- परंपरा, श्रद्धा, सण- उत्सव, संगीत व नृत्यप्रकार आणि आगळीवेगळी चित्रशैली यांचा समृद्ध वारसा त्यांना लाभला आहे. वारल्यांच्या संगीत, नृत्य व चित्रांमधून त्यांच्या समाजजीवनाचे व्यापक व यथार्थ दर्शन घडते. बहुविध रूढी, परंपरा, चालीरीती यांनी त्यांचे दैनंदिन जीवन व्यापून टाकले आहे; त्याचाही प्रत्यय त्यांच्या या कलानिर्मितीतून येतो.कलाकाराच्या उपजत प्रतिभेतून कला प्रकट होते. एकच विषय अनेक कलाकारांनी रेखाटला तरी प्रत्येकाची अभिव्यक्ती भिन्न असते. एव्हढेच कशाला एखाद्या वारली कलाकाराने सातत्याने चित्रे काढली तरी ते प्रत्येक चित्र स्वतंत्र असते. तो नव्याने साधलेला मनमोकळा संवाद असतो. शाश्वत कलानिर्मितीचा आनंद कलाकाराला व रसिकांना त्यातून मिळतो. त्यामुळे शाश्वत विकासालाही हातभार लागतो तो वेगळाच !
कलानिर्मितीचे शास्त्र आणि व्याकरण…
कलानिर्मितीच्या क्षेत्रात सामान्यत: आधी एका अंत:प्रेरणेतून निर्मिती होते. सातत्यपूर्ण अभ्यास व निरीक्षणातून शास्त्र बनते. त्यातूनच एक व्याकरणही सिध्द होते. त्या आखलेल्या वाटेवरून मागून येणारे कलाकार मार्गक्रमण करतात. कलानिर्मितीची शृंखला पुढे सुरु राहाते. काही काळानंतर त्या विशिष्ट कलानिर्मितीतील सगळ्या नियमांची पूर्वापार सांकेतिक चौकट निर्मितीच्या मूळ प्रेरणांनाच धक्का पोहोचवू लागते. मग एखाद्या नव्या प्रतिभावंताकडून आधीचे नियम बाजूला सारले जातात. जुन्या व्याकरणाची चौकट थोडी सैल करुन नवे सिद्धांत मांडले जातात. पुन्हा एक नवे व्याकरण जन्माला येते. हे चक्र अव्याहतपणे सुरु असते. नवनवीन कलाकार वेगवेगळे कलाविष्कार सादर करतात. मात्र मूळ गाभा तोच राहतो. ११०० वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत वारली चित्रशैलीतही असेच काहीसे घडले असावे. या शाश्वत कलेत पद्मश्री जिव्या सोमा मशे व अज्ञात अशा असंख्य प्रतिभावान कलाकारांचे मोठे योगदान आहे.
मो -९४२२२७२७५५