सणासुदीची आनंदचित्रे!
भारतीय संस्कृतीत श्रावणापासून सणासुदीचे दिवस सुरु होतात. दिवाळी ही तर सणांची महाराणी. सण – उत्सवांमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यातून सुख – समाधान मिळते. आनंद वृद्धिंगत होतो. आदिवासींच्या खडतर आयुष्यात सणांमुळे आनंदाचे क्षण येतात. वारली कलाकारांनी याच सकारात्मक ऊर्जेला चित्ररूप दिले आहे. सणासुदीची ही आनंदचित्रे बघणाऱ्यांंनाही समाधानाची अनुभूती देतात. वारली चित्रशैलीत नकारात्मक विषयांना थारा नाही. निसर्ग, पर्यावरण, परिसर, मानवी जीवन याविषयी शुभचिंतनच या चित्रांमध्ये रेखाटलेले दिसते. छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानण्याच्या त्यांच्या वृत्तीचे प्रतिबिंब वारली चित्रांमध्ये तरळते. चित्रातून प्रकटणारा आनंद मनामनांंत उमटतो.
ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासींची चित्रशैली त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. सहजपणे उमलणारी ती अभिव्यक्ती आहे. वारली चित्रातील रेषा,आकार सौंदर्याबरोबरच नेमका आशय रसिकांपर्यंत पोहोचवतात. या समाजाभिमुख कलेतील प्रत्येक रेषा उत्स्फूर्तपणे उमटते. साधेपणा, सोपेपणा व आकारांचे सुलभीकरण ही वारली चित्रकलेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. निरागस मनाच्या वारल्यांचे जीवन खडतर असते. त्यात सण उत्सवांचे क्षण आनंदाची झुळूक निर्माण करतात. कृषिवल वारली जमात मातीला माय मानते. त्यांचे सारे सणही धरणीमातेशी नाते सांगणारे आहेत. अलीकडच्या काळात पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार अशा मोठ्या आदिवासी गावांचे शहरीकरण झाले आहे. तेथे अलीकडे दसरा दिवाळीचा सण शहरांप्रमाणे धुमधडाक्यात साजरे केले जातात. मात्र दुर्गम पाड्यांवर अजूनही पारंपरिक सण त्यांच्या
प्रथेपरंपरेनुसार साजरे होतात. त्यात प्रामुख्याने नागपंचमी, बैलपोळा आणि होळी या सणांनाच महत्त्व आहे. होळीचा सण त्यांच्यासाठी दिवाळीपेक्षा महत्वाचा असून आधी महिनाभर दररोज छोटी होळी पेटवली जाते. नंतर होळीपौर्णिमेला सर्व पाड्याची सामुदायिक मोठी होळी पेटवतात. संध्याकाळी सुर्यास्तापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यन्त तारप्याच्या सुरांवर स्त्री पुरुष नृत्यात दंग होतात. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वारली जमातीचे परिसराशी घट्ट नाते असते. त्यांचे देव,लोकगीते, शृंगार आणि सण – उत्सवांवर निसर्गाचा ठसा उमटलेला दिसतो. परिसरातील उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग करून ते कौशल्यपूर्ण वस्तू, कलाकृती निर्माण करतात.
अश्विन महिन्यात नवीन पिके तयार झालेली असतात. घरात नवे धान्य येते. अशावेळी येणारा दिवाळीचा सण नव्या पिकाची पूजा करून साजरा होतो. अश्विनाच्या प्रारंभापासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सुमारे दीड महिना आनंदाचा हंगाम असतो.यावेळी दररोज रात्री सारे आदिवासी पाडे तारपा नृत्यात रंगून जातात. साधारणतः प्रत्येक पाड्यावर मध्यवर्ती ठिकाणी स्त्रीपुरुष एकत्र जमतात. तारपा वाजवणारा मध्यभागी उभा राहून तारप्यात सूर फुंकतो. तारपावादन करताना जागच्याजागी गिरक्या घेत लयबद्ध पदन्यास करतो. तो नृत्यसमूहाचा प्रमुख असतो. त्याच्या सभोवताली एकाआड एक स्त्री – पुरुष अशा पध्दतीने नृत्यरचना असते.
तारपा नृत्यात सर्वसामान्यपणे उंच व्यक्ती प्रथम व सर्वात ठेंगणी शेवटी असा क्रम असतो. नाचणाऱ्या रांगेतील पहिल्या पुरुषाच्या हातात घुंगुरकाठी असते. जमिनीवर काठी आपटून तो नृत्यपथकाचे नेतृत्व करतो. त्याच्या काठीच्या इशाऱ्यावर नृत्याचे वर्तुळ घड्याळाच्या काट्यानुसार किंवा त्याउलट फिरते. काहीवेळा चकलीसारखा, कधी सर्पाकार तर क्वचित पूर्ण वर्तुळ असते. सर्वांनी एकमेकांत हात गुंफलेले असतात. हातात हात, एकमेकांच्या खांद्यावर किंवा कमरेत हात लपेटून गुंफण केली जाते. लहान मुले मुख्य वर्तुळाच्या कडेला मोठयांचे अनुकरण करीत तारपा नाच शिकतात.लवकरच पारंगत होतात.तारपेवाल्याने सुरावट बदलली की नृत्याची पध्दत बदलते.काही वेळेस तारप्याच्या सुरांना तालाची साथ देण्यासाठी ढोल वाजवला जातो. तालासुरांची लय वाढली की नाचणारे बेहोश होऊन नृत्याची गती वाढवतात. घुंगरांच्या नादाला तोंडातून उत्स्फूर्तपणे निघणाऱ्या गर्जनेची संगत मिळते.अशा लयबध्द, विलोभनीय नृत्यातील पदन्यास बघणाऱ्यांंनाही खिळवून ठेवतात.
तारपा नृत्यात कुठलेही गाणे म्हटले जात नाही.टाळ्यांचा नाच तसेच बदक, मोर, पाठशिवी व इतर उपप्रकार आढळतात. दूरवर पोहोचणाऱ्या तारप्याचे सूर कानावर पडले की वारल्यांचे पाय थिरकायला लागतात. पंधरा – वीस जणांच्या समूहाने सुरु केलेले तारपा नृत्य पहाता पहाता शंभरावर केव्हा पोहोचते हे समजतच नाही.चैत्रीपौर्णिमेला डहाणू – गंजाडजवळ महालक्ष्मी गडावर यात्रा भरते. त्यावेळी भाविक वारल्यांचे शेकडो नृत्य समूह देहभान विसरून रात्रभर तारपा नृत्यात रममाण होतात. अलीकडे तारपा हे वाद्य तयार करणारे व तासनतास वाजवणारे दिवसेंदिवस कमी झाले आहेत. परिणामी नृत्याचे प्रमाणही कमी होत आहे. काही तरुण – तरुणींचे समूह हल्ली शहरांमध्ये होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तारपा नृत्याचे रंग भरतात. तारपा नृत्य जेवढे जोशपूर्ण, देखणे तेवढेच त्याचे चित्रणही मोहून टाकते. वारली चित्रशैली जगभरात लोकप्रिय होण्यात नृत्यचित्रांचा मोठा वाटा आहे. याशिवाय कामड नाच, घोर नाच, गौरीची गाणी व गौरी नाच, होळीची गाणी प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या प्रसंगी वेगवेगळ्या विधींच्या वेळी लगनगीते गायली जातात. वारली संस्कृतीचा तो पारंपरिक अनमोल ठेवा आहे. वारली बोलीभाषेतील गाणी, म्हणी यांचे संकलन करण्याचे काम डहाणूचे हरेश्वर वनगा करीत आहेत. ते प्रकाशित व्हायला हवे. तो दस्तऐवज महत्वाचा ठरेल.सर्व वाचकांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! कोविडची नियमावली पाळून सुरक्षितपणे ही दिवाळी साजरी करूया !!
वारली चित्रांनी सजतात सणांचे क्षण
सणासुदीला वारली स्त्रिया झोपडीच्या भिंती पांढरी माती, हिरवेगार शेण यांनी सारवतात. गेरूने रंगवतात. त्यावर तांदळाच्या पांढऱ्याशुभ्र रंगाने चित्रण केले जाते.वारली चित्रांनी सणांचे क्षण सजतात. या कलेला ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. श्रावणात नागपंचमीचा सण पहिला असतो. तेथून सणांची मालिका सुरु होते. यावेळी आदिवासी पाड्यांंवर आपली घरे शोभिवंत करण्याची जणू चढाओढ लागते.चित्राखेरीज भिंत म्हणजे कपड्याशिवाय माणूस अशी त्यांची भावना असते. चित्रे नसणाऱ्या भिंतीला ‘ नागडी भिंत ‘ मानतात. शहरांमध्ये कोणत्याही सण – उत्सवाची सुरुवात घरापुढे रांगोळ्या काढून आणि दारावर तोरण लावून होते. आदिवासी वारली पाड्यांवर मात्र सणांची चाहूल चित्रे रेखाटल्याने लागते. सण उत्सवापूर्वी वारली स्त्री पुरुष उत्साहाने भिंती चित्रित करतात. सणांच्या स्वागतासाठी झोपडीच्या दर्शनी भिंतीवर पाऊलांचे किंवा कोयरीचे आकार शुभचिन्हे म्हणून काढतात. परातीतल्या तांदळाच्या पिठात तळहातांच्या बाजू बुडवून लक्ष्मीचे प्रतिक असणारे ठसे उमटवले जातात. नागपंचमी, होळी व दिवाळीत वारली चित्रकलेला बहर येतो. दिवाळीच्या दिवशी झोपडीच्या दाराशेजारी शेणाचे दिवे लावतात. नव्या धान्याची, कणसरी देवीची व घांंगळी नावाच्या वाद्याची पूजा करतात. काकडभाकरीचा नैवेद्य दाखवला जातो.लग्नप्रसंगी देवचौक रंगवतात. त्याला चौक लिहिणे असे म्हणतात. एकूणच वारली चित्रशैलीचे सण – उत्सवांशी घट्ट नाते आहे.