वारली चित्रशैलीचा मूळ प्रेरणास्रोत!
उद्या ( दि.३०) तुलसी विवाह समाप्तीनंतर लग्नसराई सुरु होईल. आदिवासी वारली जमातीच्या लग्नविधींमध्ये लग्नचौक किंवा देवचौकाला महत्वाचे स्थान आहे. वधू – वरांच्या झोपडीतील भिंतीवर विवाहापूर्वी विधीपूर्वक लग्नचौक रेखाटण्यात येतो. विवाह संस्कृतीतील हा चौक वारली चित्रशैलीचा मूळ प्रेरणास्त्रोत मानला जातो. या चौकातूनच वारली कला विकसित झाली. चौकातील रेषा मुख्य व उप दिशांच्या सूचक असतात. या दिशांचे आशीर्वाद मिळतात अशी त्यांची श्रद्धा असते. चौकाच्या मध्यभागी पालघट देवीचे चित्रण केले जाते. ती मातृदेवता असून प्रजोत्पत्तीची प्रतिक असते.
आदिवासी वारली जमातीने आपली वैशिष्टयपूर्ण कलासंस्कृती जपली आहे. जशी त्यांच्या वारली चित्रशैलीला ११०० वर्षांची समृद्ध परंपरा तशीच त्यांच्या संस्कृतीलाही ! ठाणे जिल्ह्यातील वारली झोपड्यांमध्ये दर्शनी भिंतीवर व मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना चित्रे रंगवली जातात. स्वयंपाकघराला ओवारा म्हटले जाते. त्याबाजूच्या मुख्य खोलीतील भिंत चित्रांनी सजते. कोणत्याही सण – उत्सवाच्या किंवा आनंदाच्या प्रसंगी आधी घराच्या भिंती पांढऱ्या मातीने तसेच शेणाने, गेरूने सारवतात. त्यावर वारली स्त्रिया – सुवासिनी तांदळाच्या पीठाने चित्रे काढतात. त्यासाठी ब्रश म्हणून बांबूची काडी वापरली जाते.
लग्नप्रसंगी चित्रे रेखाटूनच मुहूर्त केला जातो. यावेळी लग्नचौक रेखाटण्यासाठी भगताला निमंत्रण दिले जाते. भगत म्हणजे आदिवासी समाजातला पुरोहित.तोच वारल्यांंचा तत्वचिंतक,मार्गदर्शक व सखा असतो. धवलेरी म्हणजे वयस्कर, जाणकार स्त्री पुरोहिता. तीला आदिवासी वारल्यांचे लग्न लावण्याचा अधिकार आहे. केवळ पुरोगामीत्वाचा डंका न पिटता या जमातीने ते कृतीतून सिध्द केले आहे. सुवासिनी असणारी धवलेरी लग्नाचे पौरोहित्य करते. इतकेच नव्हे तर काही भागात ती विधवा असली तरी तिचा अधिकार काढून घेतला जात नाही. उलट तिला सन्मानपूर्वक आमंत्रित केले जाते. तिच्याच मार्गदर्शनाखाली विवाहविधी पार पाडले जातात. पंचमहाभूतांना आवाहन करुन लग्नगीते गात ती लग्नसंस्कार करते.त्यावेळी तिच्या हातातील दिवा सतत तेवत असतो.
लग्नप्रसंगी झोपड्या रंगवून सजवताना प्रथम चौक काढला जातो. त्याला चौक लिहिणे असे म्हणतात. धार्मिक दृष्टीने या रेखाटनाला खूप मान देण्यात येतो. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो. त्यादिवशीच विधीपूर्वक लग्नचौक रेखाटण्याचे काम केले जाते. सातआठ निष्णात बायका मिळून ते पूर्ण करतात. नंतर ज्या घरातील विवाह सोहळा असतो त्यातील स्त्रीपुरुष व आजूबाजूचे हौशी कलाकार चौकाचा परिसर सुशोभित करतात. त्यामध्ये सूर्य, चंद्र, बाशिंग, शिडी, झोपडी, सौभाग्याचे प्रतिक असणारी फणी, कुंकवाचा करंडा, घांगळी किंवा झांगळी हे वाद्य, झाडावर मोर, लग्नमंडप, वाघदेव,पंचमहाभूतांचे प्रतिक असणारा पंचशिऱ्या हा देव, तारपावादक व वाजंत्री काढण्याची जणू स्पर्धाच लागते.
स्थळपरत्वे त्यात काही बदल होतात. पण या चौकातूनच वारली कला विकसित झाल्याचे स्पष्ट होते. देवचौकात देवतांचा वास असतो अशी वारली जमातीची दृढ श्रद्धा आहे.चौक रेखाटताना देवाचे नाव घेऊन पहिली रेषा ओढली जाते. तिला देवरेघ म्हणतात. नंतर नवरा – नवरीच्या नावाने रेषा ओढतात. मुख्य चौकाच्या आजूबाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत स्त्रिया – मुली आनंदाने आपली कलानिर्मितीची हौस भागवून घेतात. त्यामुळेच ते कोणा एकाचे न होता समूहचित्रण ठरते. निर्दोष चौक काढण्यात पटाईत असणाऱ्या धवलेरीच्या मार्गदर्शनाखाली हे सारे काम केले जाते. अलीकडे देवचौकासोबत मुलामुलीची नावे लिहिण्याची टूम निघाली आहे.
चौक लिहिणारे उपवास करून कडक ब्रम्हचर्य व नियमांचे पालन करतात.देवचौक लिहून झाल्यावर तो कापडाखाली झाकून ठेवतात. रात्री डाका वाजवून भगत धार्मिक विधी करतो. त्यावेळी तो हिरोबा देवाचे प्रतिनिधित्व करतो. चौकावरील कापड दूर करून चौकाला तो पसंतीची पावती देतो.नंतर सुवासिनी पंचारतीने चौकाचे औक्षण करतात. यावेळी होणाऱ्या विधींना देव करणं म्हणतात.
नवरा – नवरीला देवचौकाजवळ बसवून पूजाविधी केले जातात. वारली लग्नचौक हा कल्पकता व कलात्मकता यांचा सुरेख संगम आहे. लग्नचौका जवळच्या एका चौकटीत घोड्यावर स्वार झालेले नवरा नवरी चित्रित करतात. ज्यांचे लग्न लागते त्यांचेच हे चित्रण केलेले असते. घोड्यावर नवरामुलगा व मागे करवली अशी रचना केलेली असते. वधूच्या घरातील चित्रातील घोड्याचे तोंड दरवाजाकडे असते. कारण ती दुसऱ्या घरी जाणार असते तर नवरदेवाच्या घरातील घोड्याचे तोंड आतील बाजूस असते. तो आपल्याघरी नवरी आणणार असतो. इतका सूक्ष्म विचार बघणाऱ्यांंनाही थक्क करतो. निसर्ग व लग्नप्रसंग यांची गुंफण असणारा देवचौक म्हणजे आदिवासी वधूचा गौरीहरच ! त्यापुढे बसून ती चौकाची मनोभावे पूजा करते.असा हा लग्नचौक वारली चित्रशैलीचा मूळ प्रेरणास्त्रोत ठरतो.
लग्नचौक ही वारली कलेची गंगोत्री
लोककलांच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता त्यांचे जतन, संवर्धन व्हायला हवे. वारली कलेने सन्मान, प्रतिष्ठा मिळवली आहे. ती जगभरातील कॅनव्हासवर विराजमान झाली आहे. खरी गरज आहे ती ग्रामसंस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची. त्यातील चित्रकला, नृत्यकला, संगीत यात भेसळ होऊ न देण्याची खबरदारी कलाकार, कलारसिक यांनीच घेतली पाहिजे. हल्ली बऱ्याच ठिकाणी नावीन्य, प्रयोग, फ्युजन, यांच्या नावाखाली वारली कलेची अक्षरशः मोडतोड केलेली दिसते. तो ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या कलेवरचा अन्याय आहे. वारली चित्रशैलीतील लग्नचौक या कलेची गंगोत्री म्हणता येईल. तो रेखाटताना स्नान करून पूर्णपणे श्रद्धेने, निष्ठेने चौक लेखन केले जाते. आदिवासींची जिवात्म्याची कल्पना चित्रांमधून स्पष्ट होते.
कोणत्याही वस्तूत जीव असतो, चित्र काढणे म्हणजे नव्या जीवाला जन्म देणे अशी त्यांची दृढ भावना आहे. परमेश्वर किंवा अज्ञात शक्ती आपल्या कडून ते करुन घेते. आपण केवळ माध्यम आहोत असेही त्यांना प्रांजळपणे वाटते. वारली विवाह प्रसंगी वरातीची दृश्येही काढतात. त्यात घोड्यावर किंवा बैलगाडीत बसलेले वधुवर, करवली, वरमाय, तारपावादक व ढोलवादक, नृत्य करुन आनंद व्यक्त करणारे वऱ्हाडी आणि आजूबाजूचा निसर्ग यांचा समावेश असतो. मागील लेखात मी इ. सहावीच्या पाठयपुस्तकातील वारली चित्रकलेवरील धड्याचा उल्लेख केला होता. लेखक डॉ. गोविंद गारे यांनी त्यात भित्तिचित्रे रेखाटणाऱ्या स्त्रियांना धवलेरी म्हणतात असा चुकीचा उल्लेख केला आहे असे आदिवासी संघटनांचे म्हणणे आहे.