आनंदयात्री!
खडतर आयुष्यातही आदिवासी वारली जमात आनंदाने जगते. आनंदी जीवन जगण्याची जणू गुरुकिल्लीच त्यांना गवसली आहे. नृत्य, संगीत व चित्रकलेद्वारे ते आपला आनंद मुक्तपणे व्यक्त करतात. निसर्गाच्या सानिध्यात जगतांना पर्यावरण रक्षणाचे भान त्यांना उपजत असते. प्रतिकूल परिस्थितीतही जीवनाचा भरभरून आनंद कसा घ्यावा याचा वस्तुपाठ त्यांच्या जीवनशैलीतून मिळतो. म्हणून वारली कलाकार खरे आनंदयात्री आहेत. प्रत्येक क्षण आनंदात जगण्याचे तंत्र वारली चित्रे अबोलपणे शिकवतात.
दहाव्या शतकात निर्माण झालेली वारली चित्रशैली ११०० वर्षे जिवंत आहे. ती मानवी जीवनाला,त्याच्या आनंदाला चित्ररुप देते.साध्यासुध्या दैनंदिन घटनांना, प्रसंगांना कलात्मक आकार दिल्याने त्यांचे उत्कट चैतन्यमय रुप प्रकट होते.वारली चित्रकला जीवनसन्मुख आहे. या सामूहिक कलेत ‘स्व’ चे समर्पण झालेले दिसते. आदिवासी वारली जमात पुढे काय होणार याची चिंता न करता वर्तमानात जगते. आलेला प्रत्येक क्षण ते आनंदात घालवतात. आर्ट ऑफ लिव्हिंग, आर्ट ऑफ गिव्हिंग आणि आर्ट ऑफ लव्हिंग हे त्यांचे जीवनसूत्र आहे. जे समोर येते ते आनंदाने स्वीकारून वारली जमात पुढे वाटचाल करते. कशाचाही हव्यास न करण्याच्या वृत्तीमुळे ते समाधानी आहेत. हॅपिनेस इंडेक्सचे परिणाम त्यांच्या जगण्याला लावले तर वारली जमात सर्वाधिक सुखी, समाधानी आढळेल. अर्थातच त्याचे रहस्य त्यांच्या साध्यासोप्या जीवनशैलीत दडलेले आहे.कला हा आदिवासी वारली संस्कृतीचा मूलाधार आहे. पर्यावरण, निसर्ग, सभोवताल यांची हानी न होऊ देता त्यांची कला फुलते. त्यांच्या जीन्स आणि डीएनए मध्येच कला ओतप्रोत भरलेली आहे असेच म्हणावे लागेल.
संगीत, नृत्य आणि चित्रकला अक्षरशः हातातहात घालून आदिवासी वारली संस्कृतीचे संवर्धन करतात. निसर्ग, पर्यावरणावर आधारित जीवनशैली वारली जमातीने अंगिकारली आहे. त्यामुळेच शाश्वत जीवनाचा, आनंद – समाधानाचा मार्ग त्यांना सापडला आहे. त्यांच्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग असलेला निर्मितीचा चित्रोत्सव ते नेहमीच साजरा करतात. बऱ्याचदा त्यासाठी कोणतेही निमित्त देखील लागत नाही. केवळ स्वानंदासाठी होणाऱ्या या
कलानिर्मितीत ते तहानभूक विसरुन तल्लीन होतात.वारली चित्रांत मी, माझं यापलिकडची सामूहिक वृत्ती प्रकट होते. चित्र काढताना आपोआप मौन बाळगले जाते. मन अंतर्मुख होऊन मनन, चिंतन घडते. आत्मपरीक्षण व आत्मचिंतनाची संधी मिळते. रेषा, आकार रेखाटताना श्वासावर नियंत्रण येते. निसर्गात जशी लय असते तशीच ती शरीर, मन व आत्मा यांच्यातही असते. सहाजिकच चित्रकृतीत लयबद्धता निर्माण होते. वारली चित्रशैली ती बघणाऱ्यांंना मूकपणे निसर्गाच्या अधिक जवळ नेते. पर्यावरणाचे महत्त्व बिंबवते. निसर्ग व पृथ्वीमातेचे संरक्षण करायला शिकवते.चित्रात मन रमले की ते काढणाऱ्याचे व बघणाऱ्यांंचे मानसिक, शारीरिक ताणतणाव दूर होतात. निखळ आनंद निर्माण होतो.
वारली चित्र म्हणजे आनंदाने आनंदासाठी केलेली निर्मिती असेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत वारली जमात आनंद शोधते. एकूणच कला हाच आदिवासी लोकजीवनातील निखळ आनंदाचा ठेवा आहे. त्यांच्या दैनंदिन व्यवहारात वापराच्या वास्तूंंनाही कलेचा स्पर्श झालेला दिसतो. आवश्यक तेव्हढे तांत्रिक कौशल्य प्रत्येकाला परंपरागतरित्या आत्मसात झालेले असते. लग्नसोहळे, सुगीचे दिवस, विविध सण – समारंभ वारल्यांच्या जीवनात नवचैतन्य, उत्साह, आनंद निर्माण करतात. तीच आनंदाची अनुभूती वेगवेगळ्या माध्यमातून प्रकट करतांना त्यात इतरांनाही सामावून घेतले जाते. शेणामातीने सारवलेल्या व गेरूने रंगवलेल्या कुडाच्या भिंतींवर तांदळाच्या पीठाने चित्र रेखाटण्याचा आनंद अवर्णनीय असतो.त्यांच्या मोकळ्याढाकळ्या जीवनाला दांभिकतेचा जराही स्पर्श नसतो. कितीही कष्टाचे, अवघड काम असो त्यात आनंद शोधला तर कामाचे ओझे जाणवत नाही. असाच सकारात्मक विचार ते करतात. त्यामुळे तशीच मुक्त कलाभिव्यक्ती निर्माण होते. इतरांवर आनंदाचा वर्षाव करते. आनंदाचे डोही आनंद तरंग उमटतात. आदिवासी आनंदयात्री वारली कलाकारांची चित्रसंपदा अशीच अनंत काळ रसिकांना आनंद देत राहील.
—
लोकाभिमुख आदिवासी विकासाचा शिल्पकार
माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. लोकाभिमुख आदिवासी विकासाचे व्रत त्यांनी अखेरीपर्यंत पाळले. १ जून १९५० रोजी त्यांचा जन्म गरीब आदिवासी कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. वनवासी ( आता जनजातीय ) कल्याण आश्रमाच्या तलासरी येथील आश्रमशाळेत राहून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. तेथेच संचालक माधवराव काणे यांचे निस्वार्थ समाजकार्याचे संस्कार झाले. एमकॉम झाल्यावर बँकेत अधिकारी पदावर त्यांना नोकरी मिळाली. मात्र त्यांचा पिंड कार्यकर्त्याचा असल्याने ते नोकरीत रमले नाहीत. समाजातील गोरगरीब जनतेच्या उत्कर्षाची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरी सोडून १९८० पासून त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतःला पूर्णवेळ समर्पित केले. रा. स्व. संघ आणि भाजपाचे ते निष्ठावान, सक्रिय कार्यकर्ते बनले. १९८० व ८५ साली त्यांचा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला. त्यानंतर मात्र सलग सहा पंचवार्षिक निवडणूकात विजय मिळवून त्यांनी वाडा, भिवंडी, विक्रमगडचे प्रतिनिधित्व केले. १९९८ मध्ये ते अल्पकाळ मंत्री होते. युती सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री झाले. त्यांनी अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या. आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश, थेट लाभ हस्तांतरण व पेसा कायद्यांतर्गत निधीतून पालघर जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे जाळे त्यांनी विणले. माझे वारली चित्रशैलीतील योगदान पाहून त्यांनी माझी आदिवासी सेवासन्मानासाठी निवड केली. नंतर प्रकृतीच्या कारणामुळे मंत्रिपद सोडले. दिवसेंदिवस अस्तंगत होणाऱ्या वारली संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी एक प्रकल्प त्यांनी हाती घेतला होता. आदर्श कलात्मक वारलीग्राम निर्माण करण्याचे त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल ! त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली.