पशुपक्षी आमचे सखेसोबती!
आदिवासी वारली चित्रकलेत माणूस हाच केंद्रस्थानी असतो. त्याबरोबरच सभोवतालच्या पशुपक्ष्यांना ते विसरत नाहीत. दुर्गम भागातील पाड्यांवर वस्ती असणाऱ्या आदिवासी वारली जमातीने वाघाला चक्क देव मानला आहे. वाघ्यादेवाची मनोभावे पूजा केली जाते. मोराला ते समृद्धीचे प्रतिक मानतात.भरपूर पाऊस पडून सुखसमृद्धी यावी यासाठी वारल्यांच्या झोपड्या मोरांच्या सुंदर चित्रांनी सजतात. अनेक वारली चित्रांमध्ये माणसांबरोबरच प्राणी, पक्षी रेखाटलेले आढळतात. एव्हढेच नव्हे तर निसर्गसाखळीतील कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे यांनाही त्यांच्या चित्रात स्थान आहे. पर्यावरण रक्षण करीत निसर्गात रममाण होणाऱ्या आदिवासी बांधवांचे पशुपक्षी सखेसोबती आहेत. आजच्या ( दि.४ ) जागतिक प्राणी संरक्षण दिनानिमित्त व वन्यजीव सप्ताहाच्या औचित्याने हा खास लेख !
– संजय देवधर
(लेखक वारली अभ्यासक आहेत. मो. ९४२२२७२७५५)
आदिवासींचा जीवनधर्म निसर्गवादी आहे. ठाणे जिल्ह्यापासून गुजरातच्या सीमेपर्यंत वारली जमात दुर्गम पाड्यांवर रहाते. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली ११०० वर्षे त्यांनी परंपरेने जपली आहे. या कलेने माणसाला त्याचे आयुष्य कलात्मकरित्या सुंदरतेने जगण्याचे बळ दिले आहे. वारली चित्रशैलीच्या या सुंदर विश्वात प्रवेश केल्यावर मानवी जीवन किती व्यापक व सुंदरतेने नटलेले आहे याची जाणीव रसिक मनाला होते. निसर्गरम्य सभोवताल, वनसंपदा व जगण्यातला साधेपणा यातून समाधानाचा जीवनमंत्र त्यांना गवसला आहे.भौतिक, आर्थिक प्रगतीमागे न धावता निसर्गाच्या जपणुकीतून त्यांना आत्मसमाधान मिळते. आजूबाजूला असणाऱ्या पशुपक्ष्यांवर ते प्रेम करतात. त्याचे स्पष्ट प्रतिबिंब वारली चित्रांमध्ये उमटते. निसर्गाच्या चैतन्याला वारली कलाकार चित्ररूप देतात. सहजता, साधे – सोपेपणा हे वारली चित्रशैलीचे वैशिष्ट्य आहे. चित्रांमध्ये मध्यवर्ती स्थान अर्थातच माणसाला असते.अवतीभवती सातत्याने असणाऱ्या जंगली व पाळीव प्राण्यांना, पक्ष्यांना ते विसरत नाहीत. दैनंदिन जगण्याचा भाग असणाऱ्या पाळीव प्राण्यांवर त्यांचा जीव असतो. झोपडीजवळ बांधलेल्या गायी, बैल, शेळ्या, बकऱ्या तसेच आजूबाजूला असणारी कुत्री त्यांच्या चित्रांमध्ये हमखास दिसतात.
शेतीकामाच्या चित्रात शेत नांगरणारी बैलजोडी दिसते. बैलगाडीतून धान्याची व माणसांची करण्यात येणारी वाहतूक दाखवलेली असते. लग्नसोहळ्याच्या चित्रात वराची घोड्यावरून काढलेली मिरवणूक दिसते. वधूवरांची बैलगाडीतून काढलेली वरात पहायला मिळते. गायीला गोमाता मानतात. गोमांस खाणे निषिद्ध मानले जाते. वारली चित्रांमध्ये ठाणे जिल्ह्यात तसेच सभोवताली आढळणारे प्राणीच रेखाटलेले दिसतात. उंट, हत्ती, जिराफ, गेंडा, सिंह असे प्राणी वारल्यांनी बघितलेलेच नसतात. त्यामुळेच त्यांना वारली चित्रात स्थान नाही. वाघ, कोल्हे, लांडगे, माकडे, खार, हरीण हे प्राणी चित्रांमधून मुबलक प्रमाणात आढळतात. दोन उलटसुलट त्रिकोण, वर्तुळ व काही रेषांनी मनुष्याकृती आकाराला येते. प्राणी रेखाटताना दोन आडवे त्रिकोण एकमेकांना जोडतात. त्याला लंबवर्तुळाकार डोके रेखाटून विविध रेषांनी कान, हातपाय, शिंगे, शेपटी असे अवयव काढले जातात. जंगलात रहाणाऱ्या वारल्यांंना अवतीभवती फिरणारे वाघ नेहमीच दिसतात. त्यामुळेच त्यांनी वाघाला चक्क देव मानला आहे.पाड्याच्या वेशीजवळ वाघ्यादेवाची प्रतिमा असते. लांबट उभ्या आकाराच्या दगडावर किंवा लाकडी फळीवर वाघाची मूर्ती कोरलेली असते. त्याची शेंदूर, फुले वाहून नित्यनेमाने पूजा करतात.फारसे तपशील नसले तरीही नेमक्या हालचालींमुळे चित्रातले प्राणी जिवंत भासतात.
अश्विन वद्य द्वादशीला शहरी व ग्रामीण भागात वसुबारस साजरी केली जाते. त्यादिवशी आदिवासी वारली जमातीत वाघबारस उत्सव साजरा करण्यात येतो. रात्री तारपानृत्य व इतर नृत्यांमध्ये वारली स्त्री पुरुष देहभान हरपून सामील होतात. यावेळी वाघ्यादेवाचा मोठ्याने जयजयकार केला जातो. वारली चित्रात डोंगर दऱ्यातील प्राणिजीवन रेखाटलेले दिसते. निसर्ग साखळीतील किडामुंग्यांंपासून विंचू, खेकडे, साप, जाळी विणणारे कोळी यांचेही महत्त्व स्पष्ट करण्यात येते. पावसाळ्यात सर्वत्र आढळणारे बेडूक, जलचर, मासे व मासेमारीसाठी विणलेले जाळे यांचे चित्रण मोहून टाकते.वारली चित्रकारांनी निसर्गाच्या निरीक्षणातून मूलभूत आकार शोधले. आत्मसात करून त्यांचा चित्रे रेखाटण्यासाठी उपयोग केला. पाने, डोंगर यांच्या आकारातून त्रिकोण त्यांना मिळाला. पौर्णिमेचा गरगरीत वाटोळा चंद्र व बैलगाडीचे चाक बघून वर्तुळाकार सापडला. अंड्यापासून अंडाकृती आकार कळला. पक्ष्यांच्या भराऱ्या व माश्यांच्या पोहण्यातून उभ्या, आडव्या, तिरप्या रेषा तो शिकला. झाडेझुडपे व त्यावर बसलेले पक्षी अनेक वारली चित्रात दिसतात. झाडाला लटकलेले सुगरणीचे आकर्षक घरटे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ते रंगवतात.
वारली चित्रशैलीचे वेगळेपण म्हणजे चित्रात उडणारे पक्षी अधिक तपशीलवार रेखाटलेले दिसून येतात. आकाशात झेपावणाऱ्या किंवा उडणाऱ्या पक्ष्याचे डोके, डोळा, पंख, पिसे, पाय, पायाची बोटे असे सगळे तपशील काढण्यात येतात. पक्ष्यांच्या चित्रांंवरून ते कोणते पक्षी आहेत हे ओळखता येते. तुलनेत इतके तपशील प्राण्यांच्या चित्रात आढळत नाहीत. बऱ्याचदा वाघ्यादेवाच्या तसेच काही देवतांच्या चित्रात त्यांच्यावर पक्ष्यांनी छाया केलेली चित्रित केली जाते. कोंबड्या व त्यांची पिल्ले अनेक चित्रात दिसतात. वारली जमातीत कोंबड्या, बकऱ्या यांच्यावर घरातील स्त्रीचा हक्क असतो. तीच त्यांचे पालनपोषण, निगराणी करते. बांबूच्या टोपलीखाली कोंबड्या सुरक्षित ठेवतात. दाणे टिपणाऱ्या कोंबड्या व त्यांची पिल्ले हा विषय अनेक चित्रात दिसतो. निसर्ग आणि जैविक विविधता टिकून राहिली तरच मानववंश सुरक्षित राहील हे आदिवासी नक्कीच चांगले जाणतात. ऋतुचक्र व्यवस्थित फिरले तर मानवाचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल या बाबतीत ते शतकानुशतके जागरूक आहेत. हेच त्यांच्या चित्रांमधून मूकपणे व्यक्त होते. जैविक सृष्टीला, विविधततेला,निसर्ग, पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये अशीच जीवनशैली त्यांनी अंगिकारली आहे. पशुपक्ष्यांची शिकार देखील ते गरजेपुरतीच करतात. म्हणूनच ते बहारदार निसर्गचित्रणात रममाण होतात. त्यात सृष्टीविषयी, प्राणीमात्रांबद्दल आदरभाव असतो.
बोलकी चित्रे, बोलणारे पशुपक्षी…
वारली चित्रांना बऱ्याचदा पारंपरिक कथांचा आधार असतो. परंपरेने वर्षानुवर्षे बोलीभाषेत सांगितल्या जाणाऱ्या या कथांवर वारली जमातीचा विश्वास आहे. कमालीची श्रद्धा आहे. त्या कथांना आदिवासी वारली चित्रकार कल्पनेने सुंदर चित्ररूप देतात. या कथांमधील प्राणी, पक्षी माणसांसारखे बोलतात. संवाद साधतात. वेगवेगळी रूपे घेतात. त्यातून नैतिक, भावनिक, सामाजिक असे संदेश देण्यात येतात.वरवर बघतांना जे सहजसाधे निसर्गचित्र वाटते त्यामागे समृद्ध असे अफाट कथाविश्व असते. पशुपक्ष्यांच्या माध्यमातून प्रतिकात्मक संदेश दिलेला असतो. बोलीभाषेतील कहाण्या व त्यातील प्राणिजीवन, पशुपक्ष्यांचे माणसाशी असणारे गहिरे नाते यावर बोलक्या चित्रांमधून प्रकाश पडतो. मोराला तर वारली जमातीत समृद्धीचे प्रतिक मानले जाते. याविषयी स्वतंत्र लेखाद्वारे यापूर्वीच ऊहापोह केला आहे. आपल्या शेतात, परिसरात मोराने नाच केला तर भरपूर पाऊस पडेल असे त्यांना वाटते. पावसामुळे जोमदार पीक येईल. सुखसंपत्ती मिळून आनंदाचे दिवस येतील अशी त्याची दृढश्रद्धा आहे. म्हणूनच मोराला, त्याच्या नृत्याला वारली चित्रशैलीत महत्वाचे स्थान मिळाले आहे. आकर्षक, डौलदार मोराचे नृत्य तेव्हढेच सुंदरतेने सजते. मोजक्या आकार, रेषांतून केलेला आविष्कार रसिकांना तृप्त करतो.