महिलेचा विनयभंग एकास अटक
नाशिक – वारकरी संप्रदाय परिवारातील महिलांचे नंबर मिळवित घरात घुसलेल्या एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना लोखंडे मळा भागात घडली. जागृत महिलेने याबाबत पोलीसांशी संपर्क साधल्याने संशयीत पोलीसांच्या हाती लागला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी मनाजी खडांगळे (४४ रा.शेकटा, ता.पैठण, जि.औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. तो नवनाथ सानप हे बनावट नाव धारण करून वारकरी संप्रदायातील व्यक्ती असल्याचे भासवितो. ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी सांप्रदायातील वेगवेगळ्या शहरातील महिलांचे नंबर मिळवितो. गुरूवारी (दि.११) तो संगमनेर येथून आला होता. दिवसभर मिळालेल्या नंबरवरून संपर्क साधत त्याने नाशिकरोड भागात पाहूणचार घेतला. रात्री लोखंडे मळ्यात मुक्कामी गेला असता ही घटना घडली. नवनाथ भक्त असल्याचे सांगून त्याने जादूटोणा येत असल्याचे महिलेस सांगितले. यानंतर त्याने अश्लिल हावभाव करीत महिलेचा विनयभंग केला. महिलेने तात्काळ नजीकच्या पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्याने तो हाती लागला असून अधिक तपास जमादार गोसावी करीत आहेत.
—
बापलेकाकडून एकास मारहाण
नाशिक – वापरण्यासाठी दिलेला मोबाईल मागितल्याने संतप्त बापलेकाने तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना राजीवनगर वसाहतीत घडली. संशयीत बापलेकाने तरूणास मारतांना धारदारचाकूसह लाकडी दांड्याचा वापर केल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय गायकवाड व त्याचे वडिल उध्दव गायकवाड (रा.राजीवनगर वसाहत) असे मारहाण करणाºया संशयीत बापलेकाचे नाव आहे. याप्रकरणी सचिन गौतम निकाळजे (१९ रा.सदर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. निकाळजे याचा मोबाईल काही दिवासांपूर्वी अजय गायकवाड याने वापरण्यासाठी घेतला होता. शनिवारी (दि.१३) निकाळजे आपला मोबाईल परत घेण्यासाठी संशयीतांच्या घरी गेला असता ही घटना घडली. संशयीत बापलेकाने त्यास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यावेळी अजयने घरातील चाकू काढून त्याच्यावर वार केला तर त्याच्या वडिलांनी लाकडी दांडा डोक्यात मारल्याने सचिन निकाळजे जखमी झाला असून अधिक तपास जमादार पाळदे करीत आहेत.
—
दुचाकीच्या धडकेत एक ठार
नाशिक – भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय इसमाचा मृत्यु झाला. हा अपघात पेठ येथे झाला होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
हिरामण तुळशीराम जाधव (रा.पळशी – हातरूंडी ता.पेठ) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जाधव गेल्या सोमवारी (दि.८) पेठ येथे रस्त्याने पायी जात असतांना अज्ञात दुचाकीने त्यांना धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने कुटूंबियांनी जिल्हारूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिवक हॉस्पिटल येते दाखल केले असता सोमवारी (दि.१५) त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार रोकडे करीत आहेत.