सोशलमिडीयावर घोंगावताय विनाकारण भीतीची वादळे…
मुंबई : गेली दोन दिवस सोशलमिडीयावर अनेक व्हिडीओ आणि मेसेजेस व्हायरल होत की १४ ते १६ आॅक्टोबर २०२० दरम्यान असून बंगालच्या उपसागरात वादळ निर्माण होऊन ते कराची पर्यंत जाईल किंवा विदर्भ मार्गे उत्तर महाराष्ट्र आणि नंतर ते गुजराथला जाईल, ते डिप डिप्रेशन असून ते बंगालच्या उपसागरात तयार होऊन महाराष्ट्रातून आरपार करत ते मुंबईमार्गे बंगालच्या उपसागरात जाईल असे एक ना दोन अनेक मेसेजेसचीच वादळे सोशलमिडीयावर घोंगावताय. आता आपले काही खरे नाही, आता आपण उदध्वस्त होऊ अशा चर्चा शेतकरी आणि आम जनतेत सुरू आहे. उत्तरेकडील थंड वारे आणि दक्षिणेकडील उष्ण वारे एकत्र येत आहेत, १०० वर्षात कधी झाले नाही असे वादळ भयानक होईल आणि सर्व शेती उदध्वस्त होईल असे कितीतरी मेसेज फिरत आहेत. मात्र यासर्व अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि शेतकरी बांधवांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले आहे.
परतीचा पाऊस, कमी दाबाचे पट्टे, द्रोणीय स्थिती, डिप्रेशन, डिप डिप्रेशन, भयानक वादळ असे कितीतरी अशास्त्रीय शब्द वापरुन सोशल मीडियावर काही लोक आवर्जून कळत-नकळत पसरवित आहे. मात्र अशास्त्रीय गोष्टींकडे दुर्लक्ष करावे तसेच आपले मनोधैर्य न ढळू देता निडरपणे शेतकरी व सामान्य जनतेने आपले व्यवहार न घाबरता सुरू ठेवावेत असे ही प्रा. जोहरे यांनी सांगितले.
वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी साधारणपणे आठ ते दहा दिवसांचा म्हणजेच किमान २४० ते २५० तासांचा कालावधी लागतो. चक्रीवादळांच्या निर्मितीची पूर्वकल्पना आपल्याला दहा बारा दिवस अचूक मिळू शकते. वादळे ही समुद्रात किंवा सागरात निर्माण होतात. बाष्पाचा पुरवठा जोपर्यंत होतो आहे. तोपर्यंत ती जिवंत राहतात. जमिनीवर एकदा वादळ धडकले की सागरी बाष्पाचा पुरवठा खंडित होतो. परीणामी ते अत्यंत वेगाने अवघ्या काही मिनिटांत नष्ट होते. त्यामुळे वादळ धडकले तरी सागरी किनारी त्यामुळे हानी होऊ शकते. मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यातील अंतर्गत भागात वादळ येऊ शकत नाही. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होऊन विदर्भ नंतर मराठवाडा नंतर पश्चिम वा उत्तर महाराष्ट्र असा प्रवास करीत मुंबई मार्गे ते बंगालच्या उपसागरात ६० किलोमीटर ताशी वेगाने सरकत जाईल आणि १०० वर्षातील ही दुर्मिळ घटना आहे. या सर्व अवैज्ञानिक गोष्टी असून असे कधीच होणार नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जाऊ नये. तसेच, असे अफवा पसरविणारे भीतीदायक मेसेज फॅारवर्ड करू नये असे स्पष्टपणे प्रा . जोहरे यांनी सांगितले आहे.इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्राॅपीकल मेटीओराॅजी (आयआयटीएम) पाषाण पुणे येथे एक तपापेक्षा जास्त काळ शास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वादळांबाबत रिसर्च पेपर देखील त्यांनी प्रकाशित केले आहेत. एक तज्ज्ञ म्हणून अनेकदा वादळांबाबत त्यांनी टिव्ही चॅनल्सवर लाईव्ह माहिती दिली आहे. फायलिन नावाचे वादळ आले होते. तेव्हा वाढणारा पाऊस आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत देखील त्यांनी सरकारला मार्गदर्शन केले होते.
वादळ ही अतिशय संथ गतीने पुढे सरकणारी ‘सिस्टीम’ असल्याने तिचा अचूक दिशेने होणा-या वाटचालीचा वेध घेणे शक्य आहे. बिनचूक अंदाज देणारी रडार यंत्रणा, उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रे, याखेरीज भूपृष्ठावरील निरीक्षणांवरुनही त्या भागात वारे कोणत्या दिशेने, कसे वाहत आहेत यावरून वादळाची बिनचूक माहिती मिळते. थोडक्यात वादळाचा अंदाज बांधण्यासाठी किंवा पूर्वसूचना देण्यासाठी या तीनही माध्यमातून मिळालेली माहिती उपयोगी ठरते. वादळ धडकणार असल्यास त्याची अचूक सूचना देता येते. सागरी भाग व जमीन तसेच इतर अडथळे यांच्या ‘गणितीय माॅडल’च्या सहाय्याने दर काही सेकंदात वादळाचे ‘अपडेट टिपता’ येतात.
निसर्ग वादळांबाबत भीतीचे असेच मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत असतांना उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांनी व्हिडीओ व्हायरल करून शास्त्रीय माहिती देत असे काही घडणार नाही असे सांगत धीर दिला होता. आणि भीती दूर करत मोठा दिलासा दिला होता. प्रा जोहरे यांनी सांगितले तसेच घडले. निसर्ग नावाचे वादळ उत्तर महाराष्ट्रातून मध्यप्रदेशातून इंदोर मार्गे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद पर्यंत जाईल. यासर्व अफवाच निघाल्याचे सप्रमाण सिध्द झाले होते.
काही युट्यूब चॅनेल फक्त आपले प्रेक्षक वाढविण्यासाठी जाणूनबुजून खोट्या गोष्टीचे व्हिडिओ अंदाज नाव वापरत पसरवत आहे. त्यापासून सावध रहावे अशी युट्यूब चॅनल्स शेतक-यांनीच ब्लॅकलिस्ट करावीत. अफवा पसरवून शेतकरी व आम जनतेत अंदाज नावाने खोटी माहिती देणा-या ‘हवामान तज्ज्ञ’ व चॅनल्सची रितसर तक्रार मुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालयाला कळवून असे प्रयत्न हाणून पाडावेत असे आवाहन देखील जोहरे यांनी नागरिकांना केले आहे.
काही प्रसारमाध्यम देत असलेल्या अतिरंजित बातम्या व महाराष्ट्र शासनाने हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जी पत्रके सोशल मीडियावर प्रसारित केली ती पाहून तर महाराष्ट्रातील शेतक-यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा एखादा कट शिजतोय काय इतपत शंका येते. शेतक-यांच्या मानगुटीवर भितीची ‘वादळे’ यापुढे येणार नाहीत. यासाठी यापुढे प्रयत्न हवेत असे ही प्रा. जोहरे यांनी सांगितले.
जेव्हा वार्याचा ताशीवेग हा ९० ते १२४ किलोमीटर इतका असतो तेव्हा अत्यंत नाममात्र नुकसान होते, जेव्हा हा ताशीवेग १२५ ते १६४ किलोमीटर १६४ किलोमीटर असतो, तेव्हा लक्षात येण्याइतपत नुकसान होते, जेव्हा हा ताशीवेग १६४ ते २२४ किलोमीटर असते तेव्हा घरांचे छप्पर उडते व वीजपुरवठा खंडित होतो. वा-याचा वेग जेव्हा ताशी २२५ ते २७९ किलोमीटर असतो तेव्हा मालमत्तेचे नुकसान होते. ताशी २८० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त वेग असल्यास योग्य काळजी घेतली नाही तर जिवित हानी होण्याची शक्यता निर्माण होते. अशी शास्त्रीय माहिती देखील हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली. महाराष्ट्रात सध्या अशी कुठलीही शक्यता नाही त्यामुळे शेतक-यांनी व सामान्य जनतेने उगीचच बाऊ करू नये असे ते म्हणाले. आपल्या भागात पाऊस कसा होत आहे ढगफुटी होते आहे की कसे याबाबत सतर्क राहणे ही चांगली गोष्ट असले तरी उगीचच भीती बाळगू नये असेही ते म्हणाले