मुंबई – कोरोना लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलासंदर्भात येत्या सोमवारपर्यंत निर्णय घ्या अन्यथा राज्यात उग्र आंदोलन करण्याचा अल्टीमेटम मनसेने दिला आहे. यासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितले की, दिलासा देण्याबाबत यापूर्वीच राज्य सरकारने अनेक वेळा माहिती दिली. आणि आता सरकार थेट नकार देत आहे. ही बाब जनतेची फसवणूक करण्यासारखी आहे. त्यामुळेच सरकारने येत्या सोमवारपर्यंत निर्णय जाहीर न केल्यास मनसे रस्त्यावर उतरुन राज्यभरात उग्र आंदोलन करेल, असे नांदगावकर म्हणाले. राज्य सरकारने अनेक घोषणा दिल्या आणि आता अंमलबजावणी करण्याची वेळ आली तर सरकार जनतेवर अन्याय करीत आहे. हे कदापी खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.