मुंबई – अँटिलिया प्रकरणात मुंबई पोलिसातून निलंबित केलेले अधिकारी सचिन वाझे यांच्यासोबत पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहिल्या गेलेल्या महिलेचे गूढ आता उकलणार आहे. एनआयएच्या राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी सायंकाळी त्या महिलेला ताब्यात घेतले आहे. १६ फेब्रुवारीला मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत त्या महिलेला पाहिले होते.
एनआयएने मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेले वाहन आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी गुरुवारी दक्षिण मुंबईतील एका हॉटेलची आणि क्लबची झडती घेतली. तसेच ठाण्यातील एका फ्लॅटमध्येसुद्धा शोध घेतला. तिथून संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात आले. सदर महिला सचिन वाझे यांची निकटवर्तीय सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
एक इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, एनआयने गुरुवारी सायंकाळी ज्या महिलेस ताब्यात घेतले, ती तीच महिला आहे जिला सचिन वाझेंसोबत हॉटेलमध्ये पाहिले होते. ताब्यात घेण्यापूर्वी तिची चौकशी करण्यात आली. सदर महिला सचिन वाझे यांचा काळा पैसा पांढरा करत होती, असे एनआयएच्या अधिक-यांनी सांगितले. तिने दोन ओळखपत्रांचा उपयोग करून हे काम केले. तिच्याजवळ नोटा मोजण्याचे मशीन होते. ते मशीन सचिन वाझे यांच्या मर्सिडिज कारमध्ये आढळले होते.
१६ फेब्रुवारीला सचिन वाझे दक्षिण मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यासोबत एक महिला आणि पाच मोठ्या बॅग होत्या. संबंधित महिलेची ओळख न पटल्याने तिचे गूढ वाढत चालले होते. त्या बॅगमध्ये रोख रक्कम होती. घटनेच्या दिवशी सचिन वाझे पैशांनी भरलेल्या त्या पाच बॅग घेऊन चालले होते.