मुंबई – येथील वादग्रस्त स्फोटके प्रकरणात सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात असणाऱ्या एपीआय सचिन वाझे यांच्या संदर्भात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची चांगली जाण असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे वाझे यांनी गुगलप्रमाणे स्वत:चे वेगळे सर्च इंजिन आणि एक अॅप्लिकेशनही तयार केल्याचे पुढे आले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेतील सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन वाझे यांची कारकीर्द वादग्रस्त असली तरी मुंबई पोलीस दलातील वाझे हे तंत्रज्ञानात अत्यंत पारंगत असल्याची बाब समोर आली आहे. सचिन वाझे यांना त्यांचे सहकारी टेक कॉप म्हणायचे. त्यामुळे वाझे यांची चौकशी करताना आता एनआयएने चौकशी पथकात टेक्निकल एक्स्पर्टचाही समावेश केल्याची माहिती आहे.
वाझे यांनी व्हॉटसअॅपप्रमाणे स्वत:चं मोबाईल मेसेजिंग अॅप तयार केलं होतं. या अॅपचे नाव वाझे यांनी ‘डायरेक्ट बात’ असे ठेवले होते. वाझे यांच्या दाव्यानुसार हे सर्वात सुरक्षित मेसेजिंग अॅप आहे.
ऑक्टोबर २०१८ मध्ये वाझे यांनी हे अॅप लाँच केले होते. मात्र, आता हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. सध्या एनआयएच्या तंत्रज्ञांची टीम या अॅपच्या माध्यमातून झालेल्या संदेशवहनाची तपासणी करत आहे. या अॅपच्या माध्यमातून सचिन वाझे कोणाच्या संपर्कात होते, याचा शोध घेतला जात आहे.
मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेल्या सचिन वाझे यांनी २०१२ मध्ये एक सर्च इंजिनही तयार केले होते. या सर्च इंजिनचे नाव Indianpeopledirectory.com असे होते. या माध्यमातून गुगलप्रमाणे इंटरनेट सर्फिंग करता येते, असे वाझे यांचे म्हणणे आहे. तसेच २००६ मध्ये वाझे यांनी मराठी भाषेतही एक अॅप तयार केले होते. या अॅपचे नाव ‘लय भारी’ असते होते. त्यामुळे आता एनआयए यादृष्टीनेही वाझे यांची चौकशी करत आहे.