मुंबई – अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएने घटनांमधील मुख्य आरोपी सचिन वाझे याच्या महिला सहकाऱ्याच्या नावाने रजिस्टर असलेली एक महागडी बाईक जप्त केली आहे. या बाईकचा वापर दोन्ही प्रकरणांमध्ये झाला आहे, असा संशय एनआयएच्या तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.
वाझेच्या महिला सहकाऱ्याची ही बाईक एनआयएने एका टेम्पोवर टाकून दक्षिण मुंबईत आपल्या कार्यालयात आणली. या महिला सहकाऱ्याची चार दिवसांपूर्वीच चौकशी करण्यात आली होती, हे विशेष. संबंधित महिला काळा पैसा व्हाईट मनीमध्ये रुपांतर करण्याचा व्यवसाय करते. नोटा मोजण्याच्या मशीनसोबत वाझे यांच्याशी चर्चा करताना ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती एनआयएला आढळली होती. मीरा रोड येथे तिचा फ्लॅट आहे. तिच्या फ्लॅटचीही एनआयएने झाडाझडती घेतली. या दोन्ही प्रकरणांच्या तपासात एनआयएने आतापर्यंत आठहून अधिक लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत, हे महत्त्वाचे.
25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या बंगल्याच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळण्याच्या प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन याचा खुन झाल्याचे उघडकीस आले. याही प्रकरणात वाझे मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात वाझेचा जुना सहकारी विनायक शिंदे याने मदत केली होती. क्रिकेट सट्टेबाज नरेश गोर याने वाझेला 14 निनावी सीमकार्ड उपलब्ध करून दिले होते. स्कॉर्पिओ प्रकरणात एनआयएने वाझेचा आणखी एक सहकारी रियाजुद्दीन काजी यालाही अटक केली आहे. त्याच्या चौकशीतही अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत.